जीवनावश्यक वस्तूंच्या प्रचंड वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच लॉण्ड्रीवाल्याकडून कपडे धुऊन व इस्त्री करून घेणेही आता खिशाला जड होणार आहे. कपडे धुणे व इस्त्री यांच्या दरांत ताबडतोब पाच ते दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र मालक-चालक लॉण्ड्री असोसिएशनने घेतला आहे.
पॅण्ट तसेच शर्ट इस्त्री करण्यासाठी आता प्रत्येकी पाच रुपये मोजावे लागणार आहेत. आतापर्यंत पॅण्ट-शर्ट जोडी ड्रायक्लीनिंगसाठी ७० रुपये मोजावे लागत होते. त्या दरात दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील सर्व इस्त्रीची दुकाने तसेच लॉण्ड्रीच्या दुकानांमध्ये नवे दर सोमवारपासून लागू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मालक-चालक लॉण्ड्री असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष शरद कनौजिया यांनी दिली.