काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करणाऱ्या आर्थर रोड तुरुंगातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा मूळच्या आरोग्य विभागात पाठविण्यात आले आहे. आर्थिक गुन्ह्य़ातील कच्च्या कैद्यांना चांगले वैद्यकीय उपचार देण्याच्या मोबदल्यात तुरुंग प्रशासनाकडून लाखो रुपये ओरबाडले जातात, असा आरोप करून या डॉ. घुले यांनी खळबळ माजवून दिली होती. त्यांनी केलेल्या आरोपांची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत.
भुजबळ हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. दातांच्या उपचारासाठी भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठविण्याची शिफारस तुरुंगातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने केली होती. परंतु डॉ. घुले यांनी या वैद्यकीय अहवालात फेरफार करून त्यांना दातांच्या नव्हे तर अन्य वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात यावे, अशी नोंद केली. तुरुंगातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. चौकशीत डॉ. घुले यांनी भुजबळ यांच्या वैद्यकीय अहवालात फेरफार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे तुरुंग विभागाचे महानिरीक्षक बिपिनकुमार सिंग यांनी सांगितले.
डॉ. घुले यांनी भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठविल्याबद्दल त्यांची कानउघाडणी करण्यात आली आहे. ते दोषी आढळल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी शिफारसही करण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले. डॉ. घुले यांनी असे का केले, त्यांचा काय हेतू होता वा त्याला यासाठी काही आर्थिक लाभ मिळाला का आदींची चौकशी आरोग्य खात्यामार्फत सुरु आहे. त्यानंतरच ते स्पष्ट होईल, असेही सिंग यांनी सांगितले. डॉ. घुले यांना आरोग्य विभागात पाठवून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची शिफारस केल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डॉ. घुले यांनी आपण निर्दोष असल्याचा आव आणत तुरुंग प्रशासनातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. या प्रकरणीही पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.