ठाणे कारागृहाच्या तटबंदीपासून पाचशे मीटर अंतरावरील बांधकामांना परवानगी देण्यास कारागृह प्रशासनाने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने या परिसरातील सुमारे पाचशेहुन अधिक इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसण्याची शक्यता आहे. या र्निबधांचा फटका ठाणे शहरातील सर्वात मोठय़ा श्रीरंग सोसायटीसह राबोडी तसेच आसपासच्या पोलीस वसाहतीमधील धोकादायक इमारतींना बसणार आहे.
कारागृहाजवळील उंच इमारतींमुळे कैद्यांच्या जीवाला धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत यापुर्वी उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने मध्यवर्ती कारागृहांच्या सभोवताली पाचशे मीटर अंतरावरील बांधकामांबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि कारागृह उपनिरीक्षकांची सल्लागार समिती नेमली. या समितीच्या माध्यमातून यासंबंधीचे निर्णय घेण्यात येतात. ठाणे मध्यवर्ती कारागृहास लागून असलेल्या राबोडी परिसरातील सुमारे पाचशेपेक्षा अधिक झोपडय़ांच्या पुर्नविकासांचा एक प्रस्ताव मध्यंतरी ठाणे महापालिकेकडे दाखल झाला होता. मात्र, हा सर्व विभाग पाचशे मीटर परिक्षेत्रात येत असल्यामुळे या झोपडय़ांच्या पुर्नविकासाला (बीएसयुपी योजना) महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी परवानगी नाकारली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी ठाणे स्थायी सल्लागार समितीच्या बैठकीत कारागृहाच्या तटबंदीपासून दिडशे ते पाचशे मीटर अंतरापर्यंत कोणतीही बांधकाम परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट भुमिका घेतल्याचे समजते. कारागृहाच्या मध्यबिंदूपासून नव्हे तर तटबंदीपासून हे अंतर मोजले जाणार असल्याने मुख्य कारागृहाच्या सभोवताली असलेल्या शेतीच्या कुंपनापासून र्निबधीत क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. या संबधी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागाच्या वरिष्ठ सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच यासंबंधी तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय बैठका सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वसाहतींना फटका?
*श्रीरंग सोसायटीमधील शंभरहून अधिक धोकादायक इमारती
*पोलीस वसाहत, राबोडी झोपडपट्टी परिसर