तुरुंगातील ‘संघर्षां’वर उपाय; उपद्रवी कैद्यांची स्वतंत्र यादी तयार करणार

आर्थर रोड तुरुंगात दोन कच्च्या कैद्यांमध्ये झालेल्या हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच असे प्रकार टाळण्यासाठी तुरुंग प्रशासन सज्ज झाले आहे. हल्ले करण्यासाठी प्रामुख्याने कैद्यांकडून त्यांना देण्यात येणाऱ्या स्टीलच्या ताटांचा वापर केला जात असल्यामुळे याऐवजी आता फायबरची ताटे कैद्याना दिली जाणार आहेत. याशिवाय राज्यातील प्रत्येक तुरुंगातील उपद्रवी कैदी तसेच कच्च्या कैद्याची यादी तयार करून सतत उपद्रव देणाऱ्या कैद्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येणार आहे.

तुरुंगातील कैद्यांमधील मारामारी हा नियमित चर्चेचा विषय आहे. परंतु ज्यावेळी दोन कैद्यांमधील मारामारीला हिंसक रुप येते आणि त्यात कैदी जखमी होतो तेव्हा ते प्रकरण स्थानिक पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी सोपविले जाते. गुन्हा दाखल झालेल्या कैद्याना स्वतंत्र ठेवण्यात येते. कच्च्या कैद्यांमध्ये मारामारीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी तुरुंग प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जाते. परंतु काही वेळा तुरुंगातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना चुकवून कैदी मारामारी करतात. त्यांच्याकडे टोकदार वस्तू असेल तर ते त्याचा सर्रास वापर करतात. बऱ्याचवेळा ताटांचा वापर केला जात असल्यामुळेच फायबर ताटांचा पर्याय वापरला जाणार असल्याचे तुरुंग प्रशासनाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले. तुरुंगात कैद्याना ब्लेडही उपलब्ध होत नाही. तरीही गेल्या आठवडय़ात आर्थर रोड तुरुंगात ब्लेडचा वापर करून कच्च्या कैद्यांनी परस्परांवर हल्ला केला. त्यामुळे रक्तस्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणे भाग पडले. परिणामी पोलिसांनाही कळवावे लागले. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. परंतु हे हल्ले टाळण्यासाठी वेळोवेळी तुरुंग अधीक्षकांना सूचना देण्यात येतात, असेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.राज्यातील तुरुंगांतील स्थिती भयानक असून क्षमतेपेक्षा अधिक कैदी त्यात कोंबले गेले आहेत. संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित गुन्हेगारांकडून अधिक प्रमाणात आक्रमक हल्ले केले जातात, असेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.

  • मध्यवर्ती तुरुंगात कच्च्या कैद्यांमध्ये वारंवार हल्ल्याची प्रकरणे घडत असतात. यामुळे एखाद्या कैद्याच्या जिवावर बेतण्याचा संभव असतो. त्यामुळेच हल्ल्यासाठी कुठल्याही धारदार वस्तू कैद्यांना उपलब्ध होऊ नयेत याची वेळोवेळी काळजी घेतली जात असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.