पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती ही अरेरावीची असून, निकोप लोकशाहीसाठी ही कार्यपद्धती योग्य नाही, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात जनतेने मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केले. पण मोदी यांच्याबद्दलचा जनतेचा विश्वास ढळू लागला आहे व  उत्तराखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने तिन्ही जागांवर मोठय़ा मताधिक्याने मिळविलेला विजय हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. देशासमोरील कोणताही प्रश्न असो, पंतप्रधान काही मते व्यक्त करीत नाहीत. मोदी यांचा उल्लेख त्यांनी ‘मौनेंद्र मोदी’ असा केला. कोणत्याही मुद्दय़ावर जनतेला विश्वासात घेतले जात नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी कोणत्याही महत्त्वाच्या मुद्दय़ावर भूमिका घेण्याचे टाळले आहे. व्टिटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त करतात. पण ही प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केलेली असते की भाजपच्या कोणी नेत्याने दिलेली असते, हे स्पष्ट होत नाही, असेही चव्हाण म्हणाले. मोदी सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या, पण गेल्या दोन महिन्यांत हे सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.