पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

स्वातंत्र्यलढय़ात काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी त्याग आणि बलिदान केले. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या बलिदानाची काँग्रेसची थोर परंपरा आहे. स्वातंत्र्यलढय़ानंतर सर्वाधिक बलिदान भाजपच्या कार्यकर्त्यांचे झाले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असला तरी हे बलिदान कशासाठी झाले, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केला.

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मरिन ड्राईव्ह ते तारापोरवाला मत्स्यालयापर्यंत मुंबई काँग्रेसच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

निरुपम यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी सहभागी झाले होते. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने षणमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी मार्गदर्शन केले. भाजपमुळे देशातील सलोख्याचे वातावरण बिघडल्याच आरोप यावेळी आझाद यांनी केला.

भाजपच्या नव्या मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी, स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक बलिदान भाजपच्या कार्यकर्त्यांचे झाल्याचा दावा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी, भाजप आणि संघ परिवाराचा इतिहास काय हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे सांगताना जातीय वातावरण बिघडविणाऱ्या शक्तींकडून दुसरी कसली अपेक्षा करणार, असा सवाल केला.