पंतप्रधानांनी दिल्लीत मुख्यमंत्र्यांची परिषद बोलावल्याने चहापानाला हजर राहू शकणार नाही. मात्र, तुम्ही जरूर या, संसदीय कार्यमंत्री असतील, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवल्याने माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण जाम भडकले आहेत. फडणवीसांनी राज्याची परंपरा मोडीत काढून गुजरातच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, अशी जहरी टीका चव्हाण यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून येथे सुरू होत आहे. प्रथेप्रमाणे राज्यातील भाजप-सेनेच्या सरकारने येत्या रविवारी विरोधी पक्षनेत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहणे गरजेचे असताना त्यांनी पंतप्रधानांच्या परिषदेचा हवाला देऊन थेट तसे पत्रच चव्हाण यांना पाठवल्याने नवाच वाद उद्भवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी देशातील मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित केली आहे. त्यात सहभागी होण्याचे कारण समोर करून फडणवीसांनी चहापानाला येऊ शकत नाही, अशी भूमिका घेतल्याने आज चव्हाण संतापले. मुळात असे पत्र पाठवण्याचे कारणच काय, असा सवाल त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. ‘मी मुख्यमंत्री असताना कितीही व्यस्त असलो तरी चहापान कधी टाळले नाही.अनेकदा चहापानाच्या दिवशी दिल्लीत महत्त्वाच्या बैठका होत्या. त्यासाठी मी चहापानाची वेळ बदलून घेतली, पण गैरहजेरी कटाक्षाने टाळली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीची परिषद आटोपून सुद्धा या चहापानाला हजर राहता आले असते. त्यासाठी वेळ बदलणे सुद्धा समजून घेता आले असते, पण तसे न करता त्यांनी संसदीय कार्यमंत्री तुमचे स्वागत करतील, असे पत्रात नमूद करणे हा प्रकारच चुकीचा आहे’, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका केली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोधकांचा अजिबात सन्मान ठेवत नसत. आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच वाटेवर निघाले आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला.

विरोधकाची भूमिका बजावणार
राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने आता विरोधी पक्षनेतेपद तुम्हाला मिळणार का, असा प्रश्न विचारला असता या संदर्भातील घडामोडींची कल्पना नाही, असे चव्हाण म्हणाले. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींची भेट झाली. त्या वेळी राज्यातील घडामोडींवर चर्चा झाली, पण हा विषय चर्चेत आला नाही. आता राज्यात प्रामाणिकपणे विरोधकाची भूमिका बजावायची असे ठरवले आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.