माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निर्णय घेत नाहीत, अशी टीका केवळ आमच्याकडूनच नव्हे तर काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांकडूनही केली जात होती. आपण कोणताही निर्णय घाईगडबडीत घेत नाही, असे पृथ्वीराजबाबांकडून सांगण्यात येई. मग निवडणुकीच्या आधी केवळ दीड महिन्यांत प्रलंबित असलेल्या बिल्डरांच्या अनेक फाइल्स घाईघाईत हातावेगळ्या करण्यास कसा काय वेळ मिळाला, असा सवाल करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण यांच्यावर तोफ डागली.
‘काँग्रेसबरोबर आघाडी व्हावी ही राष्ट्रवादीची इच्छा होती. काँग्रेसचे दिल्लीतील नेतेही अनुकूल होते. पण चव्हाण यांचाच आघाडीला विरोध होता. आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना चव्हाण दोन दिवस कराडला निघून गेले. शरद पवार यांच्यासह अन्य नेते काँग्रेसच्या निरोपाची वाट बघत होते. निम्म्या जागांची मागणी केली असली तरी १३५ जागा आम्हाला मान्य असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामार्फत कळविले होते. पण काँग्रेसकडून प्रतिसाद देण्यात आला नाही,’ असे पवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
‘स्वच्छ मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा निर्माण केलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना संशयाच्या भोवऱ्यात उभे केले. सिंचनात घोटाळा झाल्याचे चित्र निर्माण केले. मला तांत्रिक ज्ञान काहीच नाही. अधिकाऱ्यांकडून आलेल्या फाइल्सवर आपण स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पण चौकशी समितीच्या अहवालात कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. गेली साडेतीन वर्षे निर्णय घेण्यास विलंब लावणाऱ्या चव्हाण यांनी निवडणुकींची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पटापट निर्णय घेण्याचा धडाका का लावला होता, असा सवाल अजितदादांनी केला. मंत्रिमंडळाच्या वारंवार बैठका घेण्यात आल्या. निर्णयच घ्यायचे होते तर आधी का घेण्यात आले नाहीत. तेव्हा प्रकरण तपासून घ्यावे लागेल, हे उत्तर दिले जात होते. मग निवडणुकीच्या तोंडावरच का घाई झाली? काही ठरावीक बिल्डर वा हितसंबंधियांची प्रकरणे हातावेगळी करण्याची घाई का झाली, असा प्रश्न अजित पवारांनी केला.     
(अजित पवार यांची सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात)

“गेली साडेतीन वर्षे निर्णय घेण्यास विलंब लावणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पटापट निर्णय घेण्याचा धडाका का लावला होता? मंत्रिमंडळाच्या वारंवार बैठका घेण्यात आल्या. निर्णयच घ्यायचे होते तर आधी का घेण्यात आले नाहीत? तेव्हा हे प्रकरण तपासून घ्यावे लागेल.”
अजित पवार, राष्ट्रवादी नेते