मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनावरून विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेतली आहे. विद्यापीठात काय गोंधळ सुरू आहे, अशी विचारणा करीत याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना शुक्रवारी दिले.
विद्यापीठातील घसरता शैक्षणिक दर्जा आणि काही महत्त्वाच्या पदांवर केल्या जात असलेल्या मनमानी नेमणुकांच्या विरोधात डॉ. हातेकर यांनी आवाज उठविला आहे. त्याबद्दल त्यांनी राज्यपालांपर्यंत तक्रारी केल्या. परंतु त्यामुळे दुखावलेल्या कुलगुरूंनी हातेकरांनाच निलंबित करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. हातेकरांच्या निलंबनाविरोधात प्राध्यापक आणि विद्यार्थीही रस्त्यावर आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून हा गोंधळ सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनीही त्याची दखल घेतली व चौकशी करण्याचे मान्य केले. परंतु हातेकर यांचे निलंबन मागे घेण्याच्या विद्यार्थी संघटनांच्या वा प्राध्यापकांच्या मागणीबाबत ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले आहे. रविवारी होणारा दीक्षान्त समारंभही त्यामुळे अडचणीत आला आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांनीच आता त्यात लक्ष घातले आहे.
दीक्षान्त समारंभाकडे माशेलकरांची पाठ
मुंबई विद्यापीठात उद्या, रविवारी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या दीक्षान्त समारंभाला डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, डोळ्यांवर मोतीबिंदूंची शस्त्रक्रिया झाल्याने आपल्याला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे माशेलकर यांनी वेळुकर यांना ई-मेलद्वारे कळवले आहे. असे असले तरी दीक्षान्त समारंभाच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.