लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला पराभव, मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची खेळी, यामुळे संतप्त झालेल्या व बंडाच्या पवित्र्यात असलेल्या नारायण राणे यांची खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच मनधरणी करावी लागली. मंगळवारी विधान भवनात बंद खोलीत दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासोबत खलबते झाली. असंतुष्ट आमदारांनाही मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणून त्यांची नाराजी दूर करण्याचा माणिकरावांचा प्रयत्न सुरू होता.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच विधान भवनाचा परिसर शोकाकूल झाला. अशा वातावरणातही मुख्यमंत्री चव्हाण यांनी नारायण राणे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भोजनाचे निमित्त करून चव्हाण व राणे यांच्यात बंद खोलीत सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यानंतर माणिकराव ठाकरे, चव्हाण व राणे यांच्यात काही वेळ खलबते झाली. त्यानंतर कॉंग्रेसचे काही आमदारही गटा-गटाने मुख्यमंत्र्यांना भेटत होते. माणिकराव ठाकरे त्यासाठी मध्यस्थी करीत होते. राणे यांच्याशी आपली भेट झाली, त्यावेळी राजकीय व इतर काही प्रशासकीय मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, परंतु चर्चेतील तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. या भेटीमुळे राणे समाधानी झाले का, असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी त्यावरही भाष्य करण्याचे टाळले.  
लोकसभा निवडणुकीत मुलगा नीलेशचा पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच मंत्रिमंडळातून राणे व अन्य चार मंत्र्यांना वगळण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या राणे यांनी बंडाची भाषा बोलायला सुरुवात केली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी दोन-तीन दिवसात मी माझी भूमिका जाहीर करणार आहे, असे सूचक वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राणे भाजपच्या वाटेवर, अशी चर्चाही सुरू झाली. राणे यांच्याबरोबर काही आमदारही अंसुष्ट असून तेही बंडाच्या तयारीत आहेत, अशी कुजबूज सुरू झाली.  मुख्यमंत्र्यांच्या गोटात त्यामुळे चलबिचल सुरू झाली होती.  

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे पक्षातून बाहेर गेले तर आधीच खचलेल्या काँग्रेससाठी ते अडचणीचे ठरू शकतात, म्हणून त्यांची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे.