नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सोयीसुविधांच्या तक्रारीची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून ‘आयआरसीटीसी’ची उपहारगृह सेवा बंद करण्यात आली आहे. उपहारगृहासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खासदारांचे वर्तन योग्य नसून लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून वर्तणूक ठेवणे, आवश्यक असल्याची टिप्पणी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात निकृष्ट दर्जाचे भोजन मिळते. इतरही अनेक गैरसुविधा असून निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी दखल न घेतल्याने शिवसेना खासदारांनी नुकतेच आंदोलन केले होते. लोकसभेत बुधवारी त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून खासदारांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे.  या तक्रारींची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दिल्लीतील निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून त्यांच्याकडून वस्तुस्थितीची माहितीही घेतली.

‘मूळ कारण मागेच राहिले’
नवी दिल्ली:‘हा प्रकार म्हणजे गोध्रा दंगलीसारखाच झाला. ही दंगल का उसळली याचे मूळ कारण नंतर सर्वच विसरले. आठवण राहिली फक्त त्यानंतर उसळलेल्या गुजरात दंगलीची. महाराष्ट्र सदनातील गोंधळाबाबतही असेच म्हणता येईल..’ शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया. आता या प्रकरणाला वेगळाच रंग दिला जात असल्याचे अडसूळ म्हणाले. महाराष्ट्र सदनातील एकूणच अव्यवस्थेबद्दल आम्ही रोष व्यक्त केला होता.