पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

मुंबई : आघाडी सरकारच्या काळात स्वतंत्र प्रवर्ग नेमून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फडणवीस सरकारनेही तसाच निर्णय घेतला आहे. आम्ही आरक्षण दिले, असा गाजावाजा भाजप नेते करीत असले तरी आधीच्या आणि आताच्या आरक्षणात फरक काय, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेस सरकारच्या काळातही मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. न्यायालयात आरक्षणाचा निर्णय टिकला नाही. सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारने पाठपुरावा करायला पाहिजे होता. आमच्या सरकारने सारी प्रक्रिया पूर्ण केली होती, असा दावाही चव्हाण यांनी केला. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. मराठा समाजातील युवकांना रोजगार आणि शिक्षणात आरक्षणाचा लाभ होणार असल्यास त्याला कोणाचाच विरोध असणार नाही. प्रत्यक्ष आरक्षणाचा तात्काळ लाभ मिळो, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली.

आम्हीच मराठा समाजाला आरक्षण दिले, असा दावा भाजपची मंडळी करीत आहेत. पण न्यायालयात हे आरक्षण टिकावे, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले. तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सूतोवाच सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. तमिळनाडूतील आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यास त्यालाही न्यायालयात पुन्हा आव्हान दिले जाईल. न्यायालयात हे आरक्षण टिकावे या दृष्टीने सरकारला प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागला अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली.