तूरडाळीचे उत्पादन मोठे झाल्याने राज्यात सध्या भयानक परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नाही. तुरीला दर नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यात विविध ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्यांच्यात रोष पसरला आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना सामोरे जाणे, समस्या दूर करण्याचे सोडून राज्याचे कृषी मंत्री, अन्नधान्य वितरण मंत्री विधिमंडळाचे शिष्टमंडळ घेऊन परदेश दौऱ्यावर गेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तूर डाळप्रकरणी लक्ष घालून योग्य ते पाऊल उचलावे अशी, विनंती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

 

परदेश दौऱ्यावर गेलेल्या मंत्र्यांना महाराष्ट्रात परत बोलवा अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यंदा राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. सुमारे २० लाख टन उत्पादन झाल्यामुळे १५ मार्च या खरेदीच्या अंतिम मुदतीला तीनवेळा वाढ देऊन शेतकऱ्यांकडील तूर विकत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार २२ एप्रिल रोजी शेवटची खरेदी करण्यात आली. तथापि या खरेदीत शेतकऱ्यांची तूर व्यापाऱ्यांनी शासनाला विकल्याच्या अनेक घटना आढळून आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची शेतीच दोन एकर एवढी आहे, त्यांच्या नावे शेकडो टन तूर विक्रीसाठी आणण्यात आल्याचे आढळून आले.

अनेक शेतकऱ्यांची तूर सरकारकडून खरेदी करण्यात आलेली नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. राजकीय पक्ष व संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. दोन दिवसांपूर्वी बळीराजा शेतकरी संघटने मंत्रालयासमोर तूर डाळ आणि कांदे फेकून आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे तूर खरेदीत ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कबूल केले होते.