निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी हात आखडता घेऊ नये अशी सत्ताधाऱ्यांकडून मागणी केली जात असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीत महत्त्वाच्या असलेल्या शहरांतील पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ४०० कोटी रुपये मंजूर केले.
वसई-विरार, नंदुरबार आणि देगलूर या तीन शहरांमध्ये काँग्रेस किंवा मित्रपक्षांचा प्रभाव आहे. वसई-विरारच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी द्या, अशी हितेंद्र ठाकूर यांची सातत्याने सरकारकडे मागणी होती. पालघर लोकसभा मतदारसंघात ठाकूर यांचे वर्चस्व असून, गेल्या वेळी ठाकूर यांच्या पक्षाचा खासदार निवडून आला होता. लोकसभा आणि राज्यात ठाकूर यांनी काँग्रेसला साथ दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकूर यांची तयारी असल्यास पालघरची जागा त्यांना सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. ठाकूर यांना खुश करण्याकरिताच २६९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निम्मी रक्कम म्हणजे १३५ कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत. नंदुरबार हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. इंदिरा गांधी किंवा आता सोनिया गांधी प्रचाराची सुरुवात किंवा सरकारी योजनेचा प्रारंभ करण्याकरिता नेहमीच नंदुरबारची निवड करतात. नंदुरबार शहरातील रस्ते विकास कामांसाठी १०० कोटी रुपये खर्च येणार असून, यापैकी ८० कोटी राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले.
मराठवाडय़ात नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी २१ कोटी खर्चापैकी १७ कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडला मदत करून काँग्रेसने त्यांची नाराजी काही प्रमाणात तरी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री सक्रिय
सरकारच्या पातळीवर निर्णय घेतले जात नाहीत वा फाईली रखडवून ठेवल्या जातात, अशी टीका मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांवर केली होती. त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यापाठोपाठ शहरांच्या विकासांकरिता ४०० कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली, आणि मुख्यमंत्री सक्रिय झाले, अशी चर्चाही सुरू झाली.