|| रेश्मा शिवडेकर

शिक्षण विभागातील अधिकारी आणि महाविद्यालये सामील?

ग्राहकांची खासगी माहिती इंटरनेट कंपन्यांना पुरविण्यावरून आणि त्यामुळे होणाऱ्या खासगीपणाच्या हक्काच्या पायमल्लीवरून जगभर वादंग सुरू असताना अकरावीला ऑनलाइन प्रक्रियेच्या आधारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती बिनदिक्कत खासगी क्लासचालकांना पुरविली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. या माहितीच्या आधारे नीट, जेईई, सीईटीच्या टायअप, इंटिग्रेटेड कोचिंगकरिता विद्यार्थ्यांना गळाला लावण्याचे क्लासचालकांचे प्रयत्न आहेत. विशेष म्हणजे, क्लासशी ‘टायअप’ करणारी महाविद्यालये बंद करू, असे शिक्षणमंत्री जाहीरपणे सांगत असतानाच नामांकित महाविद्यालयांची नावे घेऊन क्लासचालक  ‘ग्राहकां’ना भुलवीत आहेत.

‘मुंबई महानगर प्रदेश’ (एमएमआर) परिसरातील अकरावीच्या सुमारे तीन लाख जागांकरिता दुसरी जागावाटप यादी गुरुवारी जाहीर झाली. तत्पूर्वी ५ जुलैला जाहीर झालेल्या पहिल्या यादीनंतर दुसऱ्याच दिवशी क्लासचालकांचे संदेश काही विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर येऊ लागले. मुख्य म्हणजे आपल्या क्लासची, विद्यार्थ्यांना देऊ करत असलेल्या सवलती-शिष्यवृत्तींची जाहिरात करतानाच ‘तुम्हाला अमुक अमुक महाविद्यालयात  प्रवेश मिळाला आहे.. तुमचे  अभिनंदन..’ असेही या संदेशांमध्ये नमूद असल्याने विद्यार्थी-पालक चक्रावले आहेत.

केवळ एकाच नव्हे तर इतरही अनेक क्लासच्या नावे गेले काही दिवस संदेश येत असल्याचे एका विद्यार्थ्यांच्या नातेवाईकाने सांगितले. ‘माझ्या पुतण्याने अकरावी प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज केला होता. प्रवेशअर्ज ऑनलाइन भरताना माहितीच्या देवाणघेवाणीकरिता मी माझा भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता. त्याला पहिल्या फेरीत विलेपार्लेतील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचे आम्हाला ५ जुलैला कळले. मात्र दुसऱ्याच दिवशी माझ्या भ्रमणध्वनीवर एका खासगी क्लासकडून संदेश आला. या संदेशात संबंधित महाविद्यालयाचा असलेला उल्लेख पाहून आम्ही चक्रावून गेलो,’ असे स्वत: प्राध्यापक असलेल्या या व्यक्तीने सांगितले. ‘तेव्हापासून माझ्या भ्रमणध्वनीवर क्लासचालकांचे संदेश येऊन धडकत आहेत. त्यांचे स्वरूप पाहता केवळ माझ्या पुतण्याचा म्हणून असलेला (प्रत्यक्षात माझाच) संपर्क क्रमांकच नव्हे तर त्याला पहिल्या फेरीत कुठल्या महाविद्यालयात जागा दिली गेली आहे, कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा आहे, याची माहितीही संदेश पाठविणाऱ्याकडे असावी,’ अशी पुस्ती त्यांनी जोडली.

अशाच प्रकारचा संदेश आलेल्या एका विद्यार्थ्यांने ही माहिती प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या उपसंचालक कार्यालयाने किंवा संबंधित महाविद्यालयाने क्लासचालकांना पुरविली असावी, अशी शंका व्यक्त केली. हे संदेश पाठविताना सर्रास इंटिग्रेटेड, टायअप असा उल्लेख केला जात आहे. तसेच, विद्यार्थ्यांना भुलविण्याकरिता नामांकित महाविद्यालयांची नावे घेतली जात आहेत. नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी इंटिग्रेडेड, टायअप करणारी महाविद्यालये बंद करू, असा इशारा दिला होता. मात्र, ते जिथे राहतात त्या विलेपार्ले आणि आजूबाजूच्या परिसरातील नामांकित महाविद्यालयांचीच नावे घेऊन क्लासचालक आपली जाहिरात करत आहेत हे विशेष!

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करताना भरलेली गोपनीय माहिती क्लासचालकांना कशी मिळते, या बाबत एमएमआरच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी असलेले शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यालयातील दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांमार्फत संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. या गंभीर प्रकाराची दखल घेत विद्यार्थी संघटनांनी मात्र आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचे स्पष्टीकरण संबंधित महाविद्यालयांनी व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी द्यायलाच हवे. विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती वितरित करून नफेखोरी करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. येथून पुढे विद्यार्थ्यांची माहिती गोपनीय न राहिल्यास शिक्षण  विभागातील संबंधित अधिकारी आणि प्राचार्य यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर सतत संपर्क साधून ‘फोन लावा’ आंदोलन छेडू, असा इशारा ‘आंबेकडर स्टुडंट्स असोसिएशन’चे बुद्धभूषण कांबळे याने दिला आहे.

होतेय काय?

अकरावीसाठी ऑनलाइन यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा तपशील घेऊन नीट, जेईई, सीईटीच्या टायअप, इंटिग्रेटेड कोचिंगकरिता  शिकवणी वर्गात त्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांना मोबाइलवर खासगी क्लासचे संदेश येत आहेत. या प्रकारावरून शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि काही प्रतिष्ठित महाविद्यालये पैसा कमावण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव व संपर्क क्रमांक इत्यादी वैयक्तिक माहिती क्लासचालकांना देत असल्याचे उघड झाले आहे.

  • एमएमआरमधील अकरावीच्या एकूण जागा – सुमारे ३ लाख १० हजार
  • एमएमआरमधील अकरावी प्रवेशेच्छुक विद्यार्थी – सुमारे २ लाख ३१ हजार