एकीकडे करोनाशी लढण्यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टर दिवसरात्र झटत असताना मात्र राज्यातील बहुतांश खासगी दवाखाने, नर्सिग होम्समधील बारुग्ण विभागातील डॉक्टरांनी भीतीने रुग्णसेवा देण्याचे नाकारल्याने उपचारासाठी जायचे कुठे असा प्रश्न रुग्णांपुढे निर्माण झाला आहे.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवाअंतर्गत दवाखाने सुरू राहतील अशी हमी सरकारने दिली असली तरी अनेक खासगी दवाखान्यांनी ३१ मार्चपर्यत बंदची पाटी लावली आहे. तर ताप,सर्दीच्या रुग्णांसाठी नर्सिग होम्सने दरवाजे बंद केले आहेत.

सोमवारी माझ्या मुलाला घशामध्ये संसर्ग झाल्याने नेहमीच्या होमियोपॅथी डॉक्टरकडे गेलो तर दवाखाना ३१ मार्चपर्यत बंद केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. फोन केला तर नीट औषधेही सांगितली नाहीत. दोनच दिवसात त्याला तापही आला. म्हणून जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलो तर त्यांनीही बारुग्ण विभाग बंद केल्याचे समजले. अजून एका नर्सिग होम्समध्ये विचारून मुलाला घेऊन गेलो तर त्यांनी ताप, सर्दी म्हटल्यावर रुग्णालयाची पायरीसुद्धा चढू दिली नाही. ऐरोलीत पावलावर खासगी दवाखाने आणि रुग्णालये असूनही माझ्या मुलाला उपचार घेता आले नाहीत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी केवळ सरकारी रुग्णालयांची आहे का, असा प्रश्न एमटीएनएलचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र गजरे यांनी  ‘लोकसत्ता’ शी बोलताना उपस्थित केला.

राज्यात सर्वच जिल्ह्यंमध्ये थोडय़ा फार फरकाने हीच स्थिती आहे. खासगी दवाखाने बंद असल्याने नाईलाजास्तव सरकारी रुग्णालयातील बारुग्ण विभागात तुडंब गर्दी होत आहे. रुग्णालयात सध्या करोनाग्रस्त रुग्ण, संशयित रुग्ण आणि बा रुग्ण विभागात दरदिवशी १५० रुग्णांची गर्दी. एकाचवेळी याचा सामना करताना आमची तारेवरची कसरत होत असल्याचे यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले.

खासगी दवाखाने, बारुग्ण विभाग विभाग बंद केल्यास साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते, असे राज्य इंडियन मेडिकल असोसिएशने स्पष्ट केले आहे. तसेच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र तरीही खासगी दवाखान्यांनी सेवा देण्याचे नाकारले आहे.

‘खासगी रुग्णसेवा लवकरच सुरू होईल’

सुरूवातीच्या काळात मास्क आणि सॅनिटायजर डॉक्टरांसाठीही उपलब्ध नसल्याने त्यांनी दवाखाने बंद केले होते. ज्येष्ठ व्यक्ती जोखमीच्या गटात असल्याने ६५ वर्षांवरील डॉक्टरांनी सध्या रुग्णसेवा न देण्याचा सल्ला संघटनेने दिला आहे. संचारबंदीमध्ये डॉक्टरांना दवाखान्यापर्यत जाण्यासही पोलीसांकडून सहकार्य केले जात नाही, अशाही काही तक्रारी आमच्यापर्यत आलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशीही याबाबत चर्चा केली आहे. या आठवडय़ात खासगी रुग्णसेवा सुरू होईल, असे आश्वासन राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.