दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सीएसएमटी ते पनवेल उन्नत मार्गासाठी एका खासगी कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडेही पाठविला असून चर्चा सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) देण्यात आली. उन्नत प्रकल्प खासगी कंपनीमार्फत उभारतानाच लोकलही याच कंपनीमार्फत चालवण्याचे नियोजन आहे.

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्ग झाल्यास सध्याचा ७५ मिनिटांचा प्रवास कालावधी ४५ मिनिटावर येईल. हा मार्ग नवी मुंबई विमानतळालाही जोडण्यात येणार आहे. परंतु प्रकल्पाच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ‘एमयुटीपी-३ ए’ अंतर्गत एमआरव्हीसीकडून प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.  एमयुटीपी प्रकल्प राबविताना राज्य सरकारकडूूनही निधी प्राप्त होतो. त्यामुळे उन्नत प्रकल्पासाठी पुढाकार घेतलेल्या खासगी कंपनीबाबत राज्य सरकारशीही चर्चा केली जात असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक रवी शंकर खुराना यांनी दिली. रेल्वे मंडळाकडेही चर्चा होत असून मंजुरी मिळाली तर पुढील प्रक्रिया राबविली जाईल.