पालिकेकडून लस उपलब्ध नाही; खासगी रुग्णालयांचे थेट कंपन्यांकडून लस घेण्याचे प्रयत्न

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : मोठय़ा कंपन्यांची कार्यालये वा गृहनिर्माण संस्थांतील लसीकरण मोहीम राबविणाऱ्या खासगी रुग्णालयांना थेट कंपन्यांकडून लस घ्यावी लागणार आहे. यासाठी पालिका लस उपलब्ध करून देणार नाही. सध्या लसीचा तुटवडा असताना कंपन्यांकडून थेट लस कशी उपलब्ध होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, कंपन्यांची कार्यालये वा गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये लसीकरणास परवानगी देण्याची पालिकेची योजना बारगळण्याची चिन्हे आहेत.

मुंबईतील लसीकरणाला गती मिळावी यासाठी पालिकेने कार्यालये व गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. मात्र या लसीकरण मोहिमेसाठी कंपन्या वा गृहनिर्माण संस्थांना खासगी रुग्णालयांशी करार करावा लागणार आहे. अशा पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पालिकेला कळवावी लागणार आहे. कर्मचारी वा रहिवाशांना करोना प्रतिबंध लस देण्याची जबाबदारी घेणाऱ्या खासगी रुग्णालयांनाच ती उपलब्ध करावी लागणार आहे. म्हणजेच रुग्णालयांना थेट लस उत्पादक कंपनीकडून ती घ्यावी लागणार आहे.

पालिकेने या योजनेची घोषणा करीत नियमावली जाहीर केल्यानंतर अनेक गृहनिर्माण संस्थांमधील रहिवासी सुखावले होते. रुग्णालयांतील वा प्रभागांतील लसीकरण केंद्रांमध्ये सध्या प्रचंड गर्दी होत आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातच लसीकरण मोहीम पार पडली तर केंद्रांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही, असे रहिवाशांना वाटत होते. त्यामुळे अनेक सोसायटय़ांनी खासगी रुग्णालयांकडे लसीकरण मोहिमेसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. लशीच्या उपलब्धतेबाबत स्पष्टता नसल्यामुळे खासगी रुग्णालयांना गृहनिर्माण संस्थांचे अर्ज स्वीकारण्यापलीकडे काहीच करता आलेले नाही.  सध्या करोना प्रतिबंधक लसीचा प्रचंड तुटवडा आहे. शासकीय आणि पालिकेच्या केंद्रांमध्येच लसीकरण मोहीम सुरू आहे. लशीअभावी बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण बंद आहे. पालिकेने आता प्रभाग पातळीवर लसीकरण केंद्र सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे. या केंद्रांना प्रतिदिन १०० लस मात्रा देण्यात येत आहेत. त्यामुळे या केंद्रांवर दर दिवशी १०० जणांचेच लसीकरण होत आहे. घराजवळ लस मिळणार म्हणून या केंद्रावर स्थानिक रहिवाशी मोठी गर्दी करीत आहेत. परंतु लसीअभावी त्यांच्या पदरात निराशा पडत आहे. पालिकेने गृहनिर्माण सोसायटय़ांच्या आवारात लसीकरणाला हिरवा कंदील दाखवला होता. परंतु खासगी रुग्णालयांना लस मिळणे दुरापास्त झाल्याने ही योजनाही बारगळण्याची चिन्हे आहेत.

 

कार्यालये वा गृहनिर्माण सोसायटीमध्ये खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे. उभयतांनी लसीकरणासाठी करार करून त्याची माहिती पालिकेला द्यायची आहे. तसेच कर्मचारी वा रहिवाशांसाठी लागणारी लस खासगी रुग्णालयानेच कंपनीकडून खरेदी करायची आहे. पालिकेकडून लस उपलब्ध करता येणार नाही.

सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त