खासगी रुग्णालयांत अत्यल्प करोना रुग्णांवर उपचार

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सप्टेंबरमध्ये खासगी रुग्णालयांमध्ये अत्यल्प रुग्णांवरच उपचार केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. ही रुग्णालये जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचेच यावरून निदर्शनास येते.

राज्यात सप्टेंबरमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होते. त्यातील केवळ एक टक्का रुग्ण महात्मा फुले योजना लागू असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल होते. यावरून योजनेतील खासगी रुग्णालयांत अत्यल्प करोनाबाधितांना उपचार दिले जात असल्याचे स्पष्ट होते.

करोना साथीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत एक हजार रुग्णालये सर्वासाठी खुली केली असली तरी खासगी रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याने प्रत्यक्षात योजनेच्या लाभार्थ्यांनाच आर्थिक चणचण असतानाही उपचार खर्चाची तजवीज करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

करोनाचा उद्रेकानंतर सरकारने जनआरोग्य योजनेअंतर्गत एक हजार रुग्णालये सर्वासाठी खुली केली जात असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता करोनाबाधितांना सरकारी रुग्णालयांत खाटा उपलब्ध नसल्या तरी खासगी रुग्णालयांत मोफत उपचार मिळतील, असे चित्र निर्माण करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात करोना उपचार देणारी तुटपुंजी खासगी रुग्णालये आणि रुग्णालयांकडून मिळणारा अत्यल्प प्रतिसाद यामुळे लाभार्थी रुग्णांना उपचार खर्चाचा आर्थिक भार उचलावा लागत आहे.

पुण्यातील वस्तुस्थिती

पुणे शहरात ७५ हून अधिक खासगी रुग्णालये या जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. परंतु यातील १६ रुग्णालयांमध्येच करोना उपचार दिले जातात. सप्टेंबपर्यंत पुण्यात रुग्णांची संख्या इतक्या मोठय़ा प्रमाणात होती की सरकारी रुग्णालयांत त्यांच्यासाठी खाटाच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांनाही अन्य खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागले. त्याचा आर्थिक भार रुग्णाच्या कुटुंबांना सोसावा लागला. काही रुग्णालये तर योजनेअंतर्गत उपचार देण्यास टाळाटाळ करीत होती, असे जनआरोग्य अभियान संस्थेच्या शकुंतला भालेराव यांनी सांगितले.

नागपूरमधील वास्तव

नागपूरमध्ये या योजनेत ११ रुग्णालये आहेत, परंतु सध्या पाच रुग्णालये करोना उपचारासाठी उपलब्ध आहेत. ही पाचही सरकारी रुग्णालये आहेत. योजनेतील काही खासगी रुग्णालयांना करोना उपचार देण्याची मागणी आम्ही केली होती, परंतु सोईसुविधा नसल्याचे कारण देत ती उपचार देण्यास तयार नाहीत, अशी माहिती नागपूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे ग्रामीणमधील स्थिती

पुणे ग्रामीण भागात योजनेतील काही खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांना योजनेची माहिती दिली जात होती आणि आम्हाला या योजनेतून उपचार नको, असे लेखी घेण्याचे काही प्रकार घडले आहेत. याविरोधात आम्ही तक्रारही केली असल्याचे जन आरोग्य अभियान संस्थेचे विनोद शेंडे यांनी सांगितले. योजनेअंतर्गत करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी २० सेवा खासगी रुग्णालयांत उपलब्ध केल्या आहेत. त्यात गंभीर प्रकृतीच्या रुग्णांसाठीच्या सेवांचा समावेश आहे. परंतु इतर वैद्यकीय सेवा समाविष्ट नसल्याने रुग्णांना उपचार घेण्यात अडचणी येत आहेत. तसेच निश्चित केलेले उपचार दरही तुलनेने कमी असल्याने रुग्णालयांनी योजनेअंतर्गत उपचार देण्यास नकार दिला आहे. लाभार्थ्यांना या योजनेतून खासगी रुग्णालयांत उपचार मिळत नसल्याचा आरोप करणारी जनहित याचिकाही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

तीन लाखांहून अधिक बाधितांना सेवा

राज्यात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक करोनाबाधितांवर योजनेअतंर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत, परंतु रुग्णालयांनी याबाबतची कागदपत्रे न दिल्याने आकडेवारीत रुग्णांची संख्या कमी दिसत आहे. राज्यात करोनाबाधितांवर उपचार करणारी अनेक रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत. त्यातील बहुतांश सरकारी असली तरी काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसह खासगी रुग्णालयेही आहेत, अशी माहिती महात्मा फुले जनआरोग्य योजना सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

उपचार घेतलेल्या रुग्णांची रुग्णालयांनुसार वर्गवारी (२० सप्टेंबरची आकडेवारी)

उपचाराधीन रुग्ण – २,००,०५९

                                     उपचाराधीन रुग्ण                 रुग्णांची टक्केवारी

केंद्रीय सरकारी रुग्णालय   … ……२४०                 ……..०.१

सार्वजनिक आरोग्य विभाग ……..७१,६९९ .        …….३५.८३

वैद्यकीय शिक्षण विभाग  ………४६६१.              ………२.३२

पालिका रुग्णालये     …………७५,२२४               …………..३७.६

खासगी रुग्णालये    …………४३,३४३             …………..२१.६६

रेल्वे रुग्णालये      …………….३८७                    …………….०.१

पोर्ट ट्रस्ट रुग्णालये    …………१६३               ………………०.०८

महात्मा फुले जनआरोग्य………३३९६       ……………..१.६९

(खासगी रुग्णालये)

सप्टेंबरमध्ये २१ टक्के रुग्णांवरच उपचार

राज्यात सप्टेंबरमध्ये सुमारे ७९ टक्के करोनाबाधितांवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर सुमारे २१ टक्के रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.