करोनाची साखळी तोडण्यात महापालिका व सरकारची सर्व आरोग्य यंत्रणा गुंतलेली आहे. सध्याच्या घडीला खासगी दवाखानेही बंद असल्याने त्यांचाही भार सरकारी यंत्रणेवर येतो आहे. त्यामुळे इतर आजारांना, रुग्णांना सेवा देणे अवघड झाले आहे. अशा वेळी खासगी वैद्यकीय यंत्रणेने कार्यरत राहणे आवश्यक आहे. तरच हा ताण विभागला जाईल, असे मत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले. खासगी दवाखाने सुरू ठेवण्यास सांगण्यात आले असले तरी अनेक डॉक्टर अजूनही सेवा देण्यास तयार नाहीत. त्यांनी खबरदारी घेऊन या लढाईत उतरले पाहिजे, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता विश्लेषण’या अनोख्या वेबसंवाद कार्यक्र मात शुक्र वारी आयुक्तांनी वाचकांशी थेट संवाद साधला.

देशाची ‘करोना राजधानी’ बनत चाललेल्या मुंबईमध्ये करोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची सगळी यंत्रणा जिवाची पर्वा न करता लढते आहे. मात्र हे सगळे कुठपर्यंत चालणार, आयुष्य पुन्हा सुरळीत होणार का, असे अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची परदेशी यांनी मनमोकळी उत्तरे दिली. त्यावेळी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या प्राध्यापिका ब्रेनेल डिसोझा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परदेशी यांनी खासगी वैद्यकीय सेवेची साथ अधोरेखित के ली. करोनामुळे खासगी दवाखान्यातील डॉक्टरही धास्तावलेले आहेत. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांचे सध्या खूप हाल होत असल्याकडे डिसोझा यांनी लक्ष वेधले होते.

या प्रकारचा हा पहिलाच वेब संवाद ‘लोकसत्ता’ने आपल्या वाचकांसाठी आयोजित केला होता. सामाजिक अंतर राखत समाजातील अनेक मान्यवर या ऑनलाइन चर्चेत सहभागी झाले होते. मान्यवरांच्या प्रश्नांना आयुक्तांनी उत्तरे दिली. वेबद्वारे होणाऱ्या या परिसंवादाच्या आधुनिक प्रयोगाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आयुक्तांनी मुंबईतील करोना रुग्णांची आकडेवारी, त्याचे सांख्यिकी विश्लेषण, करोना रोखण्यासाठी पालिका करीत असलेले प्रयत्न यांची सखोल माहिती दिली.

करोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यापैकी ८३ टक्के रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ३४ जण म्हणजे २ टक्के लोक गंभीर स्थितीत आहेत. २३९ जण बरे झाले आहेत. १२१ जण मृत पावले आहेत. मृतांचा आकडा कमी करण्यावर आमचा भर आहे. ५०च्या पुढे वय असलेल्या आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार असलेल्यांना धोका जास्त आहे. तसेच काही  कर्करोगाच्या आजाराचे अत्यवस्थ पण त्यांना करोना झाला आहे, अशा रुग्णांच्या मृत्यूचे कारण निश्चित करणे याबाबत आरोग्य यंत्रणा संभ्रमात आहे, असेही परदेशी म्हणाले.

परदेशात जेव्हा आजाराचा उद्रेक झाला तेव्हा आरोग्य यंत्रणा कोलमडली. मग रुग्णांना जमिनीवर ठेवण्याची वेळ आली. पण आपण आधीच खास रुग्णालयांची तयारी ठेवली आहे. फक्त अनेक आजार असलेला करोना रुग्ण येतो तेव्हा मोठी समस्या असते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार, नाटय़ निर्माते अजित भुरे, सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना, हॉटेल उद्योगाचे प्रतिनिधी गुरुबक्ष कोहली, सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्राध्यापिका ब्रेनेल डिसोझा आदी मान्यवरांनी सहभागी होऊन मुंबईकरांना भेडसावणारे प्रश्न विचारले.

तर संसर्ग वाढला नसता!

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही सुरुवातीपासून तपासणी करत होतो. ठराविक देशातून येणाऱ्यांचीच तपासणी होत होती. मात्र त्यात दुबई आणि यूएईमधून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या होत नव्हत्या. परंतु मुंबईमध्ये दुबईहुन येणारा मोठा वर्ग आहे. हा कष्टकरी वर्ग असून तिथे कामानिमित्त राहत असतात. हा सगळा वर्ग चाळी, मध्यमवर्गीय वस्त्या, झोपटपट्टय़ा, धारावी अशा ठिकाणी राहणारा आहे. त्यांची तपासणीच १५ मार्चपर्यंत होत नव्हती. मग राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करून या देशांच्या यादीत दुबईचे नाव समाविष्ट केले. त्यानंतर म्हणजे १६ मार्चनंतर दुबईतून परतलेल्या प्रवाशांचीही तपासणी होऊ लागली.

ठराविक भागात रुग्ण जास्त हे योग्यच

मुंबईमध्ये वरळी, धारावी, अंधेरी, भायखळा अशा ठराविक भागांतच मोठय़ा संख्येने रुग्ण आढळत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डेव्हिड नबारो यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. नबारो यांच्याबरोबर परदेशी यांनी काही काळ जिनिव्हामध्ये काम केले आहे. नबारो यांच्या म्हणण्यासनुसार एकाच भागात अनेक रुग्ण सापडत असतील तर ते आपल्या उपाययोजनांचे यशच आहे. म्हणजे आपण संसर्ग तिथेच रोखण्यात यशस्वी झाल्याचे नबारो यांचे म्हणणे असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.

चीनमध्ये जेव्हा या आजाराचा प्रादुर्भाव झाला तेव्हा सुरुवातीला ८-१० रुग्ण होते. मात्र पहिल्याच आठवडय़ात त्यात ८ ते १० पट वाढ झाली. या अनुभवातून दक्षिण कोरिया आणि सिंगापूर यांनी मोठय़ा प्रमाणावर तपासण्या केल्या. त्यामुळे रुग्ण वेळीच शोधल्यामुळे त्याचा प्रसार थांबला. हेच तंत्र आपण स्वीकारले असल्याचे परदेशी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले. चीन मध्ये प्रादुर्भाव वाढला तेव्हा म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात पालिकेने आपला अर्थसंकल्प मांडला. त्यात ‘करोना कोविड १९’ या आजाराच्या चाचण्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात करता येतील याकरिता यंत्रसामग्री आणण्याचे सूतोवाच केले होते. अन्य जिल्ह्य़ांमध्ये चाचण्यांसाठी केंद्र सरकारच्या प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागते आहे. मात्र मुंबई महापालिकेकडे स्वत:ची प्रयोगशाळा असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करणे शक्य असल्याचे मत त्यांनी मांडले.

यापुढे अनिश्चितताच!

मुंबईकरांच्या आणि आणि एकूणच सगळ्या जगातील लोकांच्या मनात सध्या एकच प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे, करोनाचे हे संकट नक्की संपणार कधी? लोकांना पूर्वीप्रमाणे छान जीवन कधीपासून जगता येईल? या प्रश्नाचे आयुक्तांनी दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. हे सगळे कधी संपेल हे आजच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही. यापुढे सगळ्यांनाच अनिश्चिततेला सोबत घेऊनच जगावे लागणार आहे. करोनाचे संकट गेल्यानंतरचे सगळ्यांचेच आयुष्य पूर्ण बदललेले असेल. अमेरिकेवरील हल्लय़ानंतर तिथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. करोना गेल्यानंतरही यापुढे सुरक्षा व्यवस्थेबरोबरच लोकांच्या आरोग्य चाचण्या, तपासण्या, सामाजिक अंतराचे भान यासारखे नियम पाळावे लागणार आहेत, असेही परदेशी म्हणाले.

निश्चिततेकडून अनिश्चिततेकडे!

आदिमानवाच्या काळात माणूस अनिश्चित आयुष्य जगत होता. उद्या मला जेवण मिळेल का? की मलाच वाघ खाऊन टाकेल याची त्याला शाश्वती नव्हती. मात्र तंत्रज्ञानाने माणसाने प्रगती केली आणि सगळं स्वत:च्या मनाप्रमाणे करवून घेतले. मात्र करोनामुळे पुन्हा एकदा माणसाच्या वाटय़ाला ही अनिश्चितता आली असल्याचेही ते म्हणाले