News Flash

खासगी सावकारीला सुगीचे दिवस

कर्जदार शेतकरी, व्यापाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ

कर्जदार शेतकरी, व्यापाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ

खासगी सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा दावा सरकार करीत असले तरी आजही राज्यातील शेतकरी पैशासाठी सावकाराच्याच दारात उभा राहत असल्याचे चित्र आर्थिक पाहणीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत मागील वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परवानाधारक सावकारांची संख्या १२ हजार २०८ असून मागील वर्षांच्या तुलनेत त्यात दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर नवीन परवान्यांच्या संख्येत २२.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही  समोर आले आहे.

सहकार चळवळ व्यावसायिक कौशल्याचा अभाव आणि साधनसंपत्तीची मर्यादा यामुळे संकटात सापडली आहे. ४.९९ कोटी सभासद असलेल्या १.९७ लाख सहकारी संस्थांपैकी तब्बल २०.३ टक्के सहकारी संस्था तोटय़ात असून त्यात २९.२ टक्के कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचा समावेश असल्याची माहिती आर्थिक पाहणीतून समोर आली आहे.

राज्यात ११ टक्के कृषी पतपुरवठा करणाऱ्या, ११ टक्के बिगरकृषी पतपुरवठा करणाऱ्या तर ७८ टक्के इतर संस्था आहेत. कोकण विभागात सर्वाधिक ४३ टक्के सहकारी संस्था असून त्या खालोखाल पुणे विभागात २८ टक्के तर सर्वात कमी चार टक्के सहकारी संस्था अमरावती विभागात आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत सहकारी संस्थांच्या संख्येत १२.८ टक्क्यांनी तर सभासदांच्या संख्येत ६.७ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील तोटय़ातील सहकारी संस्थांच्या प्रमाणात २५.९ टक्क्यांनी झालेली घट ही सहकार चळवळीसाठी दिलासादायक आहे.

देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी ३४ टक्के साखर कारखाने राज्यात असून त्या खालोखाल २२ टक्के कारखाने उत्तर प्रदेशात आहेत. सन २०१५-१६मध्ये देशातील एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३३.५ टक्के होता. मात्र मागील वर्षांच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. या वेळी ४८३.४९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ते मागील वर्षांच्या तुलनेत १८ टक्क्यांनी कमी आहे. तर साखरेच्या उत्पादनात १७.७ टक्क्यांनी घट आहे. राज्यातील १४ हजार ९२१ सहकारी दूध संस्थांपैकी ३७.६ टक्के आणि ८५ दूध संघापैकी २९.४ टक्के दूध संघ तोटय़ात आहेत. २७८ सहकारी सूत गिरण्यांपैकी ६८ गिरण्या सुरू असून त्यातील ६० सूतगिरण्या तोटय़ात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 1:14 am

Web Title: private money lenders
Next Stories
1 मुंबईत डॉक्टरांचा हल्लाबोल
2 शेतकऱ्यांकडे १७ हजार कोटींची वीजबिल थकबाकी
3 वांद्रय़ात दोन कोटींचे जुने चलन पकडले
Just Now!
X