खेळाचे मैदान आणि महापालिका शाळेसाठी आरक्षित असलेल्या भांडुप येथील दोन सरकारी भूखंडांवर खासगी शाळा उभी राहिली असून पालिका मात्र २५ वर्षांपासून याबाबत अनभिज्ञ आहे. पालिकेच्या कागदोपत्री हे दोन्ही भूखंड अद्याप मोकळेच आहेत! आयुक्तांच्या दरबारात याविषयी तक्रार गेली खरी, पण नोटिशीपलीकडे कारवाई शून्यच झाली.
भांडुप, कांजूर गावातील दातार वसाहतीमधील नगर भूमापन क्रमांक ६९५ आणि ६९६ हे सरकारी मालकीचे भूखंड महापालिका शाळा आणि खेळाच्या मैदानांसाठी आरक्षित आहेत. प्रत्यक्षात मात्र ६९५ वर इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या (आयईएस) माध्यमिक शाळेची चार मजली इमारत आणि ६९६ वर शाळेच्या बैठय़ा वर्ग खोल्या आहेत. शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या पवार कुटुंबियांच्या बैठय़ा घराबाबत शाळेने तक्रार करताच पालिकेने या घराचा काही भाग तोडून टाकला. पालिकेच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या प्रमिला पवार यांनी शाळेच्या अधिकृततेविषयी माहिती घेण्यासाठी पूर्व उपनगरांचे उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) यांच्या कार्यालयात माहितीच्या आधिकाराखाली अर्ज केला. त्यातून या दोन्ही भूखंडांवरील इमारतीची पालिकेच्या अभिलेखामध्ये नोंदच नसल्याचे समजले. पुढील कारवाईसाठी प्रमिला पवार यांनी पालिका कार्यालयामध्ये चकरा मारल्या परंतु अधिकारी त्यांना दादच देत नव्हते, अखेरीस त्यांनी थेट पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे धाव घेतली.
* इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या (आयईएस) शाळेवर पालिकेची केवळ नोटीस बजावण्याचीच कारवाई.
* सात दिवसांत  कागदपत्रे जमा करण्याचे महापालिकेचे आदेश; मात्र शाळा व्यवस्थापनाला अपयश.