05 April 2020

News Flash

मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीसमोर खासगी वाहतुकीचे आव्हान

शिवनेरीची सेवा टिकवताना एसटी महामंडळालाही बरेच बदल करण्याचे गरजेचे

(संग्रहित छायाचित्र)

अस्वच्छ बस, ऑनलाइन आरक्षणातील त्रुटी; खासगी संस्थेचा अहवाल

अस्वच्छ बस, ऑनलाइन आरक्षणात त्रुटी इत्यादींमुळे गेली अनेक वर्षे मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावर सेवा देणाऱ्या एसटीच्या वातानुकूलित शिवनेरी बससमोर आता खासगी प्रवासी वाहतुकीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ‘बस फॉर अस फाऊंडेशन’ या संस्थेने मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीचा अभ्यास केला आहे. यात खासगी क्षेत्रातील स्पर्धा एसटीच्या शिवनेरी सेवेला डळमळीत करत आहेत. त्यामुळे शिवनेरीची सेवा टिकवताना एसटी महामंडळालाही बरेच बदल करण्याचे गरजेचे असल्याचे निरीक्षण अभ्यास अहवालात नोंदवण्यात आले आहे.

शिवनेरीचे प्रवासी पुन्हा मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी तिकीट दरही कमी केले. मात्र हे दर कमी केल्यानंतरही प्रवासी भारमान जैसे थेच असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महामंडळाचेही प्रयत्न कमी पडत असल्याचे यात नमूद केले आहे.

काय आहेत निरीक्षणे?

* खासगी वाहतुकीचा फटका

अ) खासगी बस :  स्वारगेट किंवा पुणे स्टेशन येथून निघालेल्या शिवनेरी बस या बस स्थानकातच संपूर्णपणे भरल्या जात असून मधल्या प्रवाशांचे नेहमीच हाल होताना दिसून येतात. या मधल्या प्रवाशांसाठी नेमकी काय उपाययोजना करावी याचा अभ्यास एसटीने गेल्या अनेक वर्षांत केलेला नाही. त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी उचलला आहे. चांदणी चौक तसेच वाकड येथील हिंजवडी पूल आणि जिंजर हॉटेल या एसटीच्या थांब्यांवर अनेक खासगी बसद्वारे प्रवाशांची वाहतूक होते.

ब) खासगी टॅक्सी : शहरांतर्गत वापरणाऱ्या मोबाइल अ‍ॅप आधारित टॅक्सीने इंटरसिटी क्षेत्रातदेखील उडी घेतली आहे. मुंबई ते पुणेदरम्यान एका गाडीचे खास पॅकेज ते प्रवाशांना देतात. १५०० ते २००० रुपये एका गाडीचे दर असून गाडीतील चार प्रवाशांना ही रक्कम परवडते. सध्या अशा सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार पुलिंग हे नवीन क्षेत्र व्यापक प्रमाणात जोर धरत असून मुंबई ते पुणेसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरही याचा वापर केला जातो.

* स्वछता

प्रवासी खाद्यपदार्थ, प्लास्टिक, कागद बसमध्येच टाकतात. परिणामी बस साफ न राहिल्याने पुढील प्रवाशांना अस्वच्छ बसमधून प्रवास करणे भाग पडते. याकडे एसटी महामंडळही दुर्लक्ष करताना दिसते. रोजच्या प्रवासानंतर खराब झालेल्या बस, मळकटलेली आसने, पडदे इ. गोष्टी या ठरावीक काळानंतर स्वच्छ धुतल्या जाणे गरजेचे असताना वर्षांनुवर्षे तशाच घाणेरडय़ा अवस्थेत असतात.

* ऑनलाइन आरक्षणातील त्रुटी

उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द झालेल्या गाडय़ांचा सर्वात जास्त फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसतो. आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांच्या वेळेच्या आधी आलेल्या गाडीत मोकळी जागा असतानादेखील जागा न दिल्याच्या अनेक घटना वाकड, चांदणी चौक भागात होतात. शिवाय आरक्षण करताना सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक समस्या येऊन पैसे वजा होऊन आरक्षण न होणे, संदेश न येणे, मेल न येणे असेही प्रकार घडतात.

* प्रवासी मागणीचा न केला जाणारा विचार 

मुंबई ते पुणेदरम्यान हिंजवडी येथील अनेक आयटी कंपन्यांमधील प्रवाशांनी शिवनेरी सेवा हिंजवडीमधून सोडावी यासाठी वारंवार मागणी केलेली आहे. एसटीने या मागणीला कधीच प्रतिसाद दिला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 12:32 am

Web Title: private transportation challenge before shivneri on mumbai pune route abn 97
Next Stories
1 स्वरभावयात्रा थांबली : ज्येष्ठ भावगीत गायक विनायक जोशी यांचे निधन
2 देवेंद्र फडणवीस यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार
3 महिला सुरक्षा आणि शेतकरी प्रश्नी भाजपाचे राज्यव्यापी निषेध आंदोलन
Just Now!
X