एमबीबीएस, होमिओपॅथी, बीटेक, फार्मासिस्ट आदी व्यावसायिकांकडून वैयक्तिक मार्गदर्शनाच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या ‘प्रायव्हेट टय़ूशन्स’क्लासमध्ये, म्हणजे, खाजगी शिकवणीतही एकेका वर्गात ५० विद्यार्थी कोंबण्याची वृत्ती वाढू लागल्याने या वर्गांनाही आता दुकानदारीचे रूप येऊ लागले आहे.
रीतसर जाहिराती वगैरे करून चालविल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेसपेक्षा या खासगी शिकवण्यांचे स्वरूप वेगळे असते. दादर, माहीम, वाशी, बोरीवली, नवी मुंबई भागात तर या शिकवण्यांचा चांगलाच बोलबाला आहे. कोचिंग क्लासेसमध्ये साधारणपणे ४०-५० विद्यार्थी एकावेळी बसतात. पण, आपल्या पाल्याला विशेष मार्गदर्शन मिळावे, यासाठी एकावेळी केवळ १० ते १२ विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्याचा हा प्रकार अलीकडे लोकप्रिय झाला आहे. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, यासाठी या शिकवण्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मर्यादीत असते. अर्थात यासाठी पालकांना आपला खिसा चांगलाच मोकळा करावा लागतो. एकेका विषयाला ९० हजार या प्रमाणे तीन विषयांसाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च करण्याची ताकद असलेले पालकच या वर्गात मुलांना धाडू शकतात. पण, आता या शिकवण्या ‘स्टेटस सिम्बॉल’ बनू लागल्याने त्यांना जोरदार मागणी आहे. परिणामी विद्यार्थीसंख्या मर्यादीत ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्याचा या शिकवण्यांचा फंडाही मागे पडू लागला आहे. काही अपवाद वगळता बहुतेक खासगी शिकवण्यांमध्येही एकाचवेळेस ४० ते ५० कोंबले जात आहेत.
असे खाजगी शिकवणी वर्ग सामान्यत एमबीबीएस, होमिओपॅथी, बीटेक, फार्मासिस्ट अशा व्यावसायिकांकडून चालविले जातात. डॉक्टर, इंजिनिअर आहे असे सांगितले की विद्यार्थी पटकन जाळ्यात सापडतात, हे लक्षात आल्याने यापैकी काही क्लासचालक तर खोटय़ा पदव्या दाखवून पालकांची फसवणूक करीत आहेत. या क्लासचालकांकडून सरकार सेवा कर वसूल करीत असले तरी त्यांच्याकडे असलेल्या पदव्या खऱ्या की खोटय़ा हे तपासणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
पदवीचा अध्यापनाशी संबंध किती?
खासगी शिकवणीचालकांमध्ये एमबीबीएस, बीटेक, फार्मासिस्ट आदी व्यावसायिकांचे प्रमाण अधिक आहे. या पदवीधरांचे बारावीनंतरचे शिक्षण त्या त्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून झालेले असते. बारावीसाठी आवश्यक असलेल्या जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांशी पदवीपर्यंतच्या शिक्षणात फारसा संबंध येत नाही. खरेतर विज्ञान किंवा गणितासाठी किमान एमएस्सीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. परंतु, आपल्या व्यावसायिक पदवीच्या जोरावर खासगी शिकवण्या चालविणाऱ्यांचा विज्ञान अथवा गणिताच्या मुलभूत अध्यापनाशी कितपत संबंध येतो हा खरा प्रश्नच आहे.