रेल्वे बोर्डाचा विचार, लांब पल्ल्याच्या गाडय़ाही खासगी तत्वावर

रेल्वेला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांसह मुंबई उपनगरीय रेल्वे सेवाही खासगी कंपन्यांमार्फत चालवण्यासंदर्भात रेल्वे बोर्ड गांभीर्याने विचार करीत आहे.

मध्य रेल्वेसह एकूण सहा क्षेत्रीय रेल्वेची २७ सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक पार पडली. यात मध्य रेल्वेवरील लोकल सेवेबरोबर मुंबई ते मडगाव, मुंबई ते पुणे मार्गावरील इंटरसिटी गाडय़ांसह अन्य लांब पल्ल्याच्या गाडय़ा खासगी सेवांमार्फत चालवून उत्पन्न मिळवण्यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. खासगीकरण झाल्यास भविष्यात सवलतींच्या कराराच्या आधारे लोकलचे भाडे निश्चित करण्याचे व ते वसूल करण्याचे अधिकारही खासगी कंपन्यांना असतील, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

प्रवाशांना उत्तम सेवा, जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी खासगी कंपन्यांमार्फत रेल्वेगाडय़ा चालवण्याच्या प्रस्तावावर सध्या रेल्वे बोर्ड विचार करत आहे. दिल्ली ते लखनौ मार्गावर खासगी ऑपरेटर्समार्फत तेजस एक्स्प्रेस गाडी चालवण्यात आल्यानंतर रेल्वे बोर्डाने देशभरातील २४ मार्गाचा अभ्यास करण्यास मध्य रेल्वे (मुंबई), उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेला सांगितले होते. यामध्ये मुंबई ते मडगाव, मुंबई ते पुणे, मुंबई ते औरंगाबाद, मुंबई ते दिल्ली, मुंबई ते चेन्नई यासह एकूण २४ मार्गाचा समावेश होता. या मार्गावर खासगी रेल्वे गाडय़ा चालवणे कितपत सोयीस्कर ठरेल, त्याचा अहवाल २७ सप्टेंबर रोजी सादर करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले होते. त्यानुसार अहवाल सादर केला. यात मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकलचाही समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार दिल्लीत २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक पार पडली. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सहा क्षेत्रीय रेल्वेचे मुख्य परिचालन प्रबंधक बैठकीला उपस्थित होते. बैठकीत वेगवेगळ्या मार्गावर चर्चा झाली. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकल  खासगी कंपन्यांमार्फत चालवताना प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, भाडेदर, रेल्वेला मिळणारे उत्पन्न, कंपनीला मिळणारे उत्पन्न इत्यादीवर प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

या विषयावर यापुढे आणखी काही बैठकाही होतील. लोकल खासगींमार्फत चालवण्याचा अंतिम निर्णय झाल्यास भाडेदर त्याच कंपनीमार्फत निश्चित केले जाऊ शकतो, अशीही माहिती दिली.

इंटरसिटी गाडय़ांचे १४ मार्ग

मुंबई ते पुणे, मुंबई ते औरंगाबाद, मुंबई ते मडगाव मार्गावरील इंटरसिटी गाडय़ाही खासगी कंपन्यांमार्फत चालवण्याचा विचार केला जात आहे,. तर अन्य मार्ग पुढीलप्रमाणे-

* मुंबई ते अहमदाबाद

* दिल्ली ते चंदिगढ-अमृतसर

* दिल्ली ते जयपूर-अजमेर

* हावडा ते पुरी

* हावडा ते टाटा

* हावडा ते पटणा

* सिकंदराबाद ते विजयवाडा

* चेन्नई ते बेंगलोर

* चेन्नई ते कोईम्बतूर

* चेन्नई ते मदुराई

* एर्नाकुलम ते त्रिवेंद्रम

खासगी कंपन्यांमार्फत सेवा देण्यासाठी उपनगरीय रेल्वेचे निश्चित केलेले मार्ग : मुंबई, कोलकाता, चेन्नई, सिकंदराबाद लांब पल्ल्याच्या गाडय़ा

* दिल्ली ते मुंबई

* दिल्ली ते लखनौ

* दिल्ली ते जम्मू-कत्रा

’ दिल्ली ते हावडा

* सिकंदराबाद ते हैदराबाद

* सिकंदराबाद ते दिल्ली

* दिल्ली ते चेन्नई

* हावडा ते चेन्नई

* हावडा ते मुंबई