उमाकांत देशपांडे

‘पीपीपी‘ मॉडेलद्वारे पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न

जलसंपदा विभागाच्या राज्यभरातील १४६ अतिथिगृहांचे (गेस्ट हाऊस) खासगीकरण होणार असून ‘पीपीपी’ मॉडेलने ती विकसित केली जाणार आहेत. सध्या मोडकळीस आलेल्या या अतिथिगृहांचा कायापालट करून तिथे चांगल्या दर्जाच्या हॉटेलच्या सुविधा पर्यटकांना मिळू शकतील, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

जलसंपदा विभागाची अतिथिगृहे राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी मोक्याच्या जागी आहेत, पण सध्या त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्या इमारती मोडकळीस आलेल्या स्थितीत आहेत. प्लॅस्टर, रंगकाम उडाले आहे, दरवाजे-खिडक्या मोडल्या आहेत. बहुतेक अतिथिगृहे राहण्यायोग्य अवस्थेत नाहीत. त्यांच्या नूतनीकरणासाठी जलसंपदा विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्याकडे कुणी फारसे लक्षही देत नाही. त्यामुळे खासगीकरणाच्या माध्यमातून त्यांचा विकास केला जाईल. तिथे पर्यटकांना चांगल्या दर्जाची हॉटेल्स उपलब्ध करून दिली जातील, अशी माहितीही महाजन यांनी दिली.

सुरुवातीला ही अतिथिगृहे पर्यटन विभागाकडे देऊन विकसित करण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता जलसंपदा विभाग स्वत:च त्यासाठी पुढाकार घेऊन ‘पीपीपी’ मॉडेलने ती विकसित करणार आहे. त्यासाठी निविदा मागवून शासनास अधिक शुल्क जी कंपनी किंवा हॉटेल देईल, त्यांना ही अतिथिगृहे दहा वर्षांच्या लीजवर चालविण्यासाठी दिली जातील, असे जलसंपदा विभागाच्या उच्चपदस्थांनी सांगितले. त्यामुळे सध्या फारशा उपयोगात नसलेल्या अतिथिगृहांच्या जागेतून शासनाला चांगले उत्पन्न मिळेल. पर्यटकांनाही त्याचा फायदा होईल.

याबाबतचे धोरण तयार असून लवकरच ते मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे. शासनाच्या गरजेनुसार या अतिथिगृहात जागा उपलब्ध करून देण्याची अटही घातली जाणार आहे. मात्र, शासनाच्या राज्यभरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा बडय़ा हॉटेल्सना दहा वर्षांसाठी तुलनेने नाममात्र दरात देण्याच्या निर्णयावर टीका आणि विरोध होण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे. पर्यटन विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नूतनीकरण करून घेऊन जलसंपदा विभागाने स्वतच्या कंत्राटदारांमार्फत जर ही अतिथिगृहे चालवून पर्यटकांना उपलब्ध करून दिली, तर शासनाला अधिक महसूल मिळेल, असे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. अर्थ विभागाकडून या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता विभागाला वाटत आहे, असे उच्चपदस्थांनी सांगितले.