News Flash

‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पध्रे’चा पारितोषिक वितरण सोहळा दणक्यात

मुंबईच्या भावजीवनाचे आणि अनेक सांस्कृतिक चळवळीचे दैवत असलेल्या ‘श्री’ गणरायाची मोहक मूर्ती आणि सजावट म्हणजे मुंबईकरांच्या कल्पकतेची

मुंबईच्या भावजीवनाचे आणि अनेक सांस्कृतिक चळवळीचे दैवत असलेल्या ‘श्री’ गणरायाची मोहक मूर्ती आणि सजावट म्हणजे मुंबईकरांच्या कल्पकतेची चुणूकच असते. अशा मुंबईकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता’ गणेश उत्सव मूर्ती स्पध्रेचा पुरस्कार सोहळा बुधवारी दणक्यात पार पडला. ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले, ढोल ताशांची जोरकस, रांगडी लय-लीला आणि गणपती बाप्पाचा पुन: पुन्हा होणारा गजर अशा भारलेल्या वातावरणात  हा सोहळा जवळजवळ साडेचार तास प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे अपूर्व उत्साहात पार पडला. ‘मुंबईचा राजा’ हा मानाचा पुरस्कार डिलाइल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला मिळाल्याचे जाहीर झाल्यावर सभागृहात एकच जल्लोष झाला. पंचगंगा मंडळाला ५१ हजार एक रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
लोअर परळ येथील रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळाला ‘पर्यावरण स्नेही सजावट’ हा पुरस्कार मिळाला. रोख रक्कम १५ हजार रुपये, मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार घेताना गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. हेच ‘लोकसत्ता’ पुरस्कृत उत्सव मूर्तीच्या यशाचे गमक आहे, असे पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांने सांगितले.
लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१५ परितोषिक वितरण सोहळ्याचे वीणा वर्ल्ड प्रस्तुत आणि भारतीय आयुर्वमिा महामंडळाच्या सहकार्याने पार पडलेल्या या सोहळ्याला इंडियन ऑइल, अतुल ऑटो व बादशाह मसाला यांचे सहकार्य लाभले होते. ‘डीनएस बँक’ यांनी बँकिंग पार्टनर होते तर ‘रेड एफएम’ यांनी रेडिओ पार्टनर म्हणून काम पाहिले. वीणा वर्ल्डच्या संस्थापक संचालिका सुनिला पाटील यांच्या हस्ते ‘मुंबईचा राजा’ आणि ‘पर्यावरण स्नेही सजावट’ हे पुरस्कार प्रधान करण्यात आले. तर एक्स्प्रेस समूहाच्या कार्यकारी प्रकाशक वैदेही ठकार आणि एलआयसी ऑफ इंडियाचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक शांताराम काळे यांच्या हस्ते विभागवार पारितोषिके देण्यात आली.
गणपती उत्सवात एका प्रचंड ऊर्जेचे दर्शन घडते. दरवर्षी या स्पध्रेत गणपती मंडळे मोठय़ा संख्येने आणि उत्साहाने सहभागी होत असतात. हा समाजातील एका व्यापक ऊर्जेचा आविष्कार आहे. या ऊर्जेला विधायक वळण लागावे हा या स्पध्रेचा प्रधान हेतू आहे. गणपती हे सांस्कृतिकदृष्टय़ा विद्य्ोचे दैवत आहे. त्या विद्ववत्तेला अधिक दृढ करावे ही ‘लोकसता’ची भूमिका आहे. याशिवाय गणपतीचा देखावा प्रेक्षकांना विशद करून सांगणाऱ्या संहितांचेही कौतुक झाले पाहिजे, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
या कार्यक्रमांची सुरुवात ‘मोरया.मोरया’ या लोकप्रिय गाण्याने झाली. या पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. टाळ्या-शिट्टय़ांची उत्स्फूर्त दाद देऊन रसिक प्रेक्षकांनी सभागृह डोक्यावर घेतले. त्यानंतर ‘शारद सुंदर चंदेरी राती’ आणि ‘मायेच्या हळव्या’ या गाण्यांनाही प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. ‘जीवनगाणी’ निर्मित ‘दयाघना गजानना’ हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांनी सादर केलेली  ‘चिकमोत्यांची माळ’ आणि ‘चला जेजुरीला जाऊ ’ या रचनाना तुफान प्रतिसाद मिळाला. तर संतोष पवार यांनी सादर केलेल्या नाटय़प्रवेशाने प्रेक्षकांची ‘हसवणूक’ झाली.
राजेश भय्या आणि मनीषा गौरे या तरुण गायकांनी सादर केलेली ‘ओ, मेरे दिल के चन’, ‘जय जय शिवशंकर, काटा लगे ना कंकर’ गाण्यांनी रसिकांची मने जिकंली आणि प्रेक्षागृह डोक्यावर घेतले.
सुप्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर यांनी उत्सवमूर्ती स्पध्रेच्या निमित्ताने लोक एकत्र आले ही उत्तम गोष्ट आहे, असे सांगून याबद्दल ‘लोकसते’चे अभिनंदन केले. ‘भाऊजी’ फेम आदेश बांदेकर यांनी ‘लोकसत्ते’च्या गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा उपक्रमाचे कौतुक केले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी अशा उपक्रमामुळे कार्यकत्रे आणि कलाकार घडत असतात, असे सांगून ‘लोकसत्ता’चे अभिनंदन केले. स्मिता गवाणकर आणि हेमंत बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ढोल ताशाच्या ठेक्यावर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा उच्चार करत पुरस्कार विजेते आणि गणेश मंडळाचे असंख्य कार्यकत्रे ‘रवींद्र’मधून बाहेर पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 7:13 am

Web Title: prize ceremony of loksatta ganesh utsav murti competition
Next Stories
1 तिजोरीत खडखडाट झाल्यावर आर्थिक सुधारणांवर भर
2 ‘दुष्काळकर’ ही तर पाकीटमारी! शिवसेनेची सरकारवर टीका
3 इंद्राणी मुखर्जीचा आत्महत्येचा प्रयत्न? कारागृहात बेशुद्धावस्थेत सापडली
Just Now!
X