गणेशचतुर्थीसोबत संपूर्ण राज्यात सुरू झालेला मुसळधार पाऊस शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात प्रभावी राहणार असला तरी त्यानंतर मात्र राज्यभरातील पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील पाच दिवस कोकणात पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी राहतील.

विदर्भापासून बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकला असून त्याचवेळी अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने संपूर्ण राज्यात मुसळधार सरींचा वर्षांव सुरू आहे. विदर्भातील कमी दाबाचा पट्टा आता पश्चिमेकडे सरकत असून त्यामुळे शनिवारी नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिजोरदार वृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकल्यानंतर शनिवारपासून विदर्भ व मराठवाडय़ातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोरही ओसरण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र त्यानंतर पावसाच्या मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कायम राहतील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.
अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हीवरून येत असलेल्या पावसाळी ढगांचा प्रभाव उत्तर व मध्य भारतात जाणवणार आहे. गुजरातमध्येही शनिवारी व रविवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवार पासून उत्तर व मध्य भारतात पावसाच्या मुसळधार सरी येतील. त्यावेळी महाराष्ट्रासह दक्षिण भागात मात्र पुन्हा कोरडे वातावरण असेल.

मुंबईत तुरळक सरी
मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडपले असले आणि कोकणातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असला तरी मुंबईत मात्र शुक्रवारी केवळ तुरळक सरी पडल्या. शुक्रवारी सकाळी साडेआठवाजेपर्यंतच्या २४ तासात कुलाबा येथे अवघ्या दीड मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील केंद्रावर केवळ शिंतोडे पडल्याची नोंद आहे. शुक्रवारी रात्री साडेआठपर्यंतच्या बारा तासातही विशेष फरक पडला नाही.