विविध यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाप्रमाणेच अग्निशमन दलातील बेशिस्त, कामातील शैथिल्य व आपत्ती प्रतिसाद पद्धतीला दिलेला फाटा काळबादेवी दुर्घटनेला कारणीभूत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. कार्यपद्धती सुधारण्याबरोबरच बेशिस्त कर्मचाऱ्यांवर दंडात्मक, तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारसही अहवालात आहे. याचप्रमाणे यंत्रणेचे आधुनिकीकरण, यंत्रसामग्रीचा योग्य वापर, समन्वय व जुन्या इमारतींचे इलेक्ट्रम्ॉनिक ऑडिट करण्याची शिफारस समितीने केली आहे.
काळबादेवी येथील गोकुळ हाऊस दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या प्रमुखासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राण गमावावा लागला. याप्रकरणी अतिरिक्त पालिका आयुक्त संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील सात जणांची समिती नेमली गेली होती. रजा, निलंबन या कारणासाठी सातपैकी चार उपप्रमुख अधिकारी नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमतरता होती. उपलब्ध तीन अधिकाऱ्यांपैकीच एकावर प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. घटनेवेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मार्गदर्शित केलेल्या पद्धतीचा अवलंब झाला नाही. वरिष्ठ अधिकारी इमारतीच्या जळत्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने आग विझवण्यावरील जवानांचे लक्ष विचलित झाले, असे अहवालात म्हटले आहे. कामगार संघटनांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे बेशिस्त व कामात शैथिल्य आल्याचा गंभीर ठपकाही अहवालात आहे.

* तीन महिन्यात अग्निशमन दलाची कार्यपद्धती राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने मार्गदर्शित केल्याप्रमाणे अद्ययावत करून प्रकाशित करावी.
* कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन पद्धत अमलात आणावी, उपायुक्तांनी अधिकाऱ्यांच्या शिस्तीबाबत लक्ष ठेवावे, नियमित कवायती, वैद्यकीय तपासण्या कराव्यात अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत.
* वैद्यकीय तपासणी न करणाऱ्या तसेच वैयक्तिक सुरक्षितता गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक व शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही सांगण्यात आले आहे.