सुशांत मोरे

मध्य रेल्वेवर गेल्या चार वर्षांत चार लाख प्रवाशांची भर पडली. सध्या या मार्गावर दररोज ४४ लाख प्रवासी प्रवास करतात. यासाठी १,७०० पेक्षा जास्त फेऱ्या चालविल्या जातात. प्रवाशी संख्येच्या वाढीचा वेग पाहता, त्या तुलनेत फेऱ्या वाढविण्यात मध्य रेल्वेला यश आलेले नाही. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांवरील भार वाढला आहे. त्यात आपल्याकडील यंत्रणांचा प्रभावी वापर करण्यातही रेल्वेला अपयश आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची, पर्यायाने प्रवाशांची जुनी दुखणी ठसठसतच राहतात.

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा वारंवार बोजवारा उडतो आहे. पाऊस आता कुठे आपले रंग दाखवू लागला आहे. पण मध्य रेल्वे जणू पावसाळ्याच्या आधीपासून गोंधळाच्या रंगीत तालमीचा अनुभव प्रवाशांना देते आहे. कंटाळून प्रवाशांनी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला. काही खासदारांनीही संसदेत प्रश्न उपस्थित करून प्रवाशांची दुखणी मांडली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीहून मुंबईतील अधिकाऱ्यांचे कानही उपटले. त्याला प्रतिसाद देत लोकल गाडय़ांची काही स्थानकांदरम्यान असलेली वेगमर्यादा काढणे, कल्याण ते कुल्र्यापर्यंत उपलब्ध असलेल्या पाचव्या व सहाव्या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाडय़ांचा वेग वाढवणे, रेल्वे फाटक बंद करण्यासाठी प्रयत्न करणे आदी मार्गानी लोकल सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेने केले. परंतु रेल्वेचे दुखणे इतके जुने की त्यातून प्रवाशांची सुटका व्हायला मार्ग नाही.

अनेकदा मोठय़ा प्रश्नांना हात घालण्याच्या नादात लहान समस्या दुर्लक्षित राहतात. उदाहरणार्थ, स्थानकातील इंडिकेटर व उद्घोषणा यंत्रणा अद्ययावत केली तरी कित्येक प्रवाशांचे प्रश्न सुटतील. पण या प्रश्नाला क्षुल्लक लेखून ते दुर्लक्षित केले जातात. उदाहरणार्थ एखादी जलद लोकल स्थानकात उशिराने येत असल्याची उद्घोषणा होते. प्रवासी ती सोडून धिमी लोकल पकडण्यासाठी दुसऱ्या फलाटावर जातो, तोच जलद मार्गावर दोन-तीन गाडय़ा एका मागोमाग एक निघून गेलेल्या असतात. कधी इंडिकेटरवर टिटवाळा लोकल दाखविली जाते. पण येते कल्याण लोकल. असे विचित्र अनुभव सध्या मध्य रेल्वेचे प्रवाशी घेत असतात.

१ व २ जुलैला पडलेल्या मुसळधार पावसात कांजूरमार्ग ते दादर दरम्यान २२ लोकल व ६ लांब पल्ल्याच्या गाडय़ा मध्यरात्री सहा तास अडकल्या. लोकल किंवा मेल-एक्स्प्रेस पुढे जाणार की नाही याची माहिती प्रवाशांना देता आली असती. या माहितीद्वारे अनेकांना या मार्गावरील प्रवास टाळता आला असता. परंतु माहितीअभावी अनेक जण गाडय़ांमध्ये अडकून बसले. रेल्वेने ट्विटरवर जाहीर केले तेव्हा कुठे परिस्थितीचे गांभीर्य प्रवाशांना कळले.

आज पालिका, वाहतूक पोलीस या यंत्रणा समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करताना दिसून येतात. रेल्वे मात्र यात मागे आहे. उन्हाळी विशेष गाडय़ा, सणासुदीत सोडल्या जाणाऱ्या गाडय़ा सोडल्या तर या माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात रेल्वेला अपयश आले आहे. लोकल फेऱ्यांची अचूक माहिती देण्यासाठी पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी दिशा मोबाइल अ‍ॅप सुरू केले. मात्र हे अ‍ॅप अद्यापही प्रवाशांपर्यंत पोहोचले नाही.

लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यास त्याची माहिती प्रवाशांना लोकलमध्येच मिळावी, यासाठी गाडय़ांमध्येच तशा प्रकारची उद्घोषणा देण्याचा निर्णय दोन ते तीन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेकडून घेण्यात आला होता. त्याच्या चाचण्याही घेण्यात आल्या. लोकल गाडय़ांत ही सुविधा सुरू असल्याचा दावा मध्य रेल्वे करते. परंतु बहुतांश वेळा प्रवाशांना माहिती दिली जात नाही. प्रवाशांशी जनसंपर्क ठेवण्यास मध्य रेल्वे बरीच मागे पडते आहे, हेच यावरून म्हणावे लागेल.

पश्चिम व मध्य रेल्वेवर लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ा हाताळण्यासाठी ट्रेन मॅनेजमेण्ट सिस्टीमसारखी (टीएमएस) स्वतंत्र यंत्रणा आहे. यातून मोटरमन व गार्डशी संपर्क साधणे, ट्रेनची स्थिती समजून घेणे व त्याचे नियोजन करणे इत्यादी कामे टीमएमएसमार्फत केली जातात. पश्चिम रेल्वेवरील लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ा तसेच उद्घोषणा व इंडिकेटर या यंत्रणेशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याची अचूक माहिती मिळते. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याणपर्यंतच टीएमएस यंत्रणा इंडिकेटरशी जोडलेली आहे. त्या पुढील स्थानकांशी नाही. हार्बरवर तर टीएमएसशी अद्यापही जोडलेली नाही. मध्य रेल्वेवरील या यंत्रणा अद्ययावत न झाल्यामुळे प्रवाशांना अचूक माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.

मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी स्थानकात नवीन इंडिकेटर बसवण्याचा प्रयोग सुरू केला, पण त्याची अक्षरे (फॉण्ट) लहान असल्याने प्रवाशांना ते वाचण्यात अडचणी येत आहेत. तरीही प्रवाशांचा विचार न करता मध्य रेल्वेने स्थानकात नवीन इंडिकेटर लावण्यास सुरुवात केली आहे.

आता रेल्वे जीपीएस यंत्रणेद्वारे प्रत्येक गाडी नेमकी कुठल्या स्थानकावर आहे, त्याची माहिती प्रवाशांना देण्याचे स्वप्न दाखवीत आहे. मोबाइल अ‍ॅप विकसित करून प्रवाशांना लोकलची माहिती दिली जाईल. १५ ऑगस्टपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत येईल. लोकल स्थानकात येण्याची वेळ, एखाद्या घटनेमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली तर त्याची माहिती याद्वारे दिली जाणार आहे. परंतु जी माहिती रेल्वेला त्यांच्या अंतर्गत यंत्रणेद्वारे मिळू शकते तीही ती प्रवाशांना द्यायला तयार नाही. तर गाडीचे नेमके स्थान ती प्रवाशांसोबत कशी ‘शेअर’ करणार, अशी शंका प्रवाशांना वाटत असेल तर त्यात काहीच वावगे नाही.