23 October 2018

News Flash

समस्या राजकीय पुढाऱ्यांमुळे उद्भवतात!

देशसेवा हे जीवनाचे उद्दीष्ट असायला हवे, हा विचार वडिलांनी माझ्या मनावर बिंबवला.

षण्मुखानंद सभागृहात ‘एसआयईएस, चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिभावंत पुरस्कार’प्राप्त मान्यवर.

माजी लष्करप्रमुख जनरल विश्वनाथ शर्मा यांचे प्रतिपादन

लष्करामुळे कधीच समस्या उद्भवत नाहीत. समस्या राजकीय पुढारी निर्माण करतात. लष्कर राजकीय पुढाऱ्यांचे मिंधे नाही. लष्कर भारतीय संविधानाच्या रक्षणार्थ सतत लढत असते, अशा भावना माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) विश्वनाथ शर्मा यांनी शनिवारी षण्मुखानंद सभागृहात ‘एसआयईएस, चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिभावंत पुरस्कार’ स्वीकारताना व्यक्त केल्या.

साऊथ इंडियन एज्युकेशन संस्थेतर्फे कांची येथील चंद्रशेखर सरस्वती यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा निवृत्त जनरल शर्मा यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणब मखर्जी, नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडिजचे संचालक डॉ. बलदेव राज, स्वामी ओंकारानंद आणि भारतीय भाषाविद डॉ. डेव्हीड डीन शुलमन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला उपस्थित न राहिलेल्या मुखर्जी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुरस्कार स्वीकारला आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

लष्करात भेदभाव नसतो. कारण प्रत्येक जवान देशाच्या प्रत्येक जातीधर्मातून संविधानाच्या, देशाच्या संरक्षणाचे ध्येय बाळगून लष्करात दाखल होतो. आम्ही सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करतो. विजय दिनी हा पुरस्कार स्वीकारणे तमाम लष्करी जवानांचा सन्मान आहे, असे निवृत्त जनरल शर्मा यांनी सांगितले.

देशसेवा हे जीवनाचे उद्दीष्ट असायला हवे, हा विचार वडिलांनी माझ्या मनावर बिंबवला. पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची काहीही आवश्यकता नाही. इथेच शिक्षण घे आणि देशाची सेवा कर, असे ते नेहमी सांगत. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांचे शब्द आठवत आहेत, अशी भावना डॉ. बलदेव यांनी व्यक्त केली.

मी आयुष्यात कोणतेही पुरस्कार स्वीकारलेले नाहीत. पण हा पुरस्कार कांचीच्या शंकराचार्याच्या स्मरणार्थ असल्याने मी त्याचा स्वीकार करतो, असे सांगत स्वामी ओंकारानंद यांनी पुरस्काराचे दोन लाख रुपये संस्थेला परत केले आणि चांगल्या कार्यात वापरण्याची विनंती केली.

मूळचे इस्त्रायलचे पण तामिळ, संस्कृत आणि हिंदी यांसह जगभरातल्या विविध भाषांवर प्रभुत्व असलेल्या डॉ. शुलमन यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जेरुसलेमच्या हिब्रु विद्यापीठात ते भारतीय भाषा शिकवतात. विद्यापीठात भारतीय भाषांची गोडी असलेले अनेक विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ते पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावर अभ्यास करत आहेत.

एसआयईएसने १९९८ पासून या पुरस्काराला सुरूवात केली. याआधी डॉ. शंकर दयाळ शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. आर. चिदंबरम, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. एस. एस. सुब्बलक्ष्मी, लता मंगेशंकर, डॉ. वर्गीस कुरियन, सुनिल दत्त, अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार आदी मान्यवरांना  गौरवल्याचे संस्थेचे अध्यक्ष व्ही. शंकर यांनी यावेळी सांगितले.

 

First Published on December 17, 2017 3:34 am

Web Title: problems arise from political leaders say vishwanath sharma