मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्ता निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल सध्या तयार करण्यात येत असून या प्रकल्प अहवालाची छाननी करतानाच रस्ता प्रकल्पा नजीकच्या सागरी लाटा व पाण्याची पातळी यांचा अभ्यासही करावा लागणार आहे. त्यामुळे, या सागरी बदलांचा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण माहिती अवगत असलेली एकमेव संस्था गोव्यातील ‘राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था’ हे रस्ता प्रकल्पातील सागरी अडचणींचा अभ्यास करणार असून याला शुक्रवारी पालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
यासाठी पालिकेने मे. स्ट्रप कन्स्लटंट प्रा. लि. आणि मे. फ्रिशमन प्रभू (इंडिया) प्रा. लि. यांची अहवाल छाननीसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. यातील मे. फ्रिशमन प्रभू (इंडिया) यांनी प्रकल्प अहवालाची छाननी करून समुद्री लाटा व पाण्याची पातळी यांचे विश्लेषण होणे अनिवार्य असल्याचे पालिकेला कळवले होते. . या संस्थेने आपल्या एकूण खर्चाचा तपशील पालिकेला कळवला असून या अभ्यासासाठी ६० लाख रूपये शुल्क ही संस्था घेणार आहे.

काय अभ्यास करणार?
समुद्री लाटा, त्सुनामीची ऊंची, पाण्याचे चलन शास्त्र आणि समुद्र तळाशी होणाऱ्या बदलांचा प्रस्तावित किनारी रस्त्याच्या प्रकल्पावर होणारा परिणाम अभ्यासणार आहे.