अकरावी प्रवेशाची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली असून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला भाग १५ जुलैपासून भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांची नोंदणी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.

दहावीचा निकाल या महिना अखेरीस जाहीर करण्याचे राज्यमंडळाने जाहीर केले आहे. निकालानंतर पुढील दीड महिन्यांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन विभागाने केले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

प्रवेशासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर १५ जुलैपासून विद्यार्थी अर्जाचा पहिला भाग भरू शकतील. निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरता येईल. या भागात विद्यार्थ्यांना त्यांची माहिती भरावी लागणार आहे तर, भाग २ मध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्रम द्यायचे आहेत.

दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर दुसरा भाग भरण्याची संधी मिळणार आहे. यंदा ही प्रक्रिया शाळांमधून न होता विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने पूर्ण करावी लागणार आहे. माहिती पुस्तिकाही ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयांची नोंदणी बुधवारापासून सुरू झाली असून महाविद्यालयांचा तपशील उपसंचालक कार्यालयातून तपासून घेऊन अंतिम करण्यात येणार आहे.