यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या गळीत हंगामातील ज्या कारखान्यांनी एफआरपीच्या ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, त्यांनाच या हंगामासाठी गाळप परवाना देण्यात येणार असून एफआरपीप्रमाणे पैसे न देणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी म्हणजेच ९ लाख ८६ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. त्यातून ७६० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. शिवाय गेल्या काही दिवसांत पाऊस पडल्याने पाण्याची परिस्थितीही सुधारली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित १ ऑक्टोबरऐवजी १५ आक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.