राज्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपल्बध करून देण्याचा एक भाग म्हणून शासकीय रुग्णालयांसाठी ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी लागणाऱ्या ९० कोटी रुपये खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यत आरोग्य सुविधांची वानवाच आहे. विधिमंडळात त्यावर सातत्याने चर्चा होत असते. बहुतांश रुग्णालयांच्या रुग्णवाहिका एकतर जुन्या झाल्या आहेत, तर काही निकामी झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासकीय रुग्णालयांसाठी नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रुग्णवाहिका खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यातील प्राथिमक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व प्रादेशिक मनेरुग्णालये यांच्यासाठी सध्या ७३१ रुग्णवाहिके ंची आवश्यकता आहे. मात्र त्यापैकी  तुर्तास ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यास व त्यासाठी लागणाऱ्या ८९ कोटी ४८ लाख ७० हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी २५३, ग्रामीण रुग्णालयांसाठी १३७, जिल्हा, उपजिल्हा, स्त्री रुग्णालयांसाठी १०६ आणि मनोरुग्णालयांसाठी ४ रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार आहेत.

मनोरुग्णालयांसाठी खाटांची खरेदी

राज्यातील ठाणे, पुणे, रत्नागिरी व नागपूर या चार प्रादेशिक मनोरुग्णालयांसाठी ५६५ खाटा व गाद्यांच्या खरेदीसही शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी ६५ लाख रुपये खर्चासही मंजुरी दिली आहे. रुग्णावाहिका व खाटांच्या खरेदीबाबत आरोग्य विभागाने दोन स्वतंत्र आदेश काढले आहेत.