रेश्मा राईकवार, लोकसत्ता

मुंबई : परवानगी मिळून महिना झाला तरी सगळीकडची चित्रपटगृहे सुरू झालेली नसल्याने मोठे चित्रपट लावायची अजूनही निर्मात्यांची तयारी नाही, तर एक तरी मोठा व्यावसायिक चित्रपट प्रदर्शित करा, जेणेकरून प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये परततील आणि किमान व्यवसाय करता येईल, अशी चित्रपटगृह मालक आणि वितरकांची मागणी आहे. ही कोंडी फुटत नसल्याने सध्या डिसेंबरपासून नवे हिंदी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असले तरी हे सगळे स्टार कलाकारांचे चित्रपट नसल्याने व्यवसायाच्या दृष्टीने चित्रपटगृहांची पाटी कोरीच आहे.

महाराष्ट्रातही चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर दिवाळीच्या आठवडय़ात झी स्टुडिओचा ‘सूरज पे मंगल भारी’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची पुरेशी जाहिरात न झाल्याने प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा जुनेच चित्रपट दाखवण्याचा मार्ग स्वीकारलेल्या चित्रपटगृहांना डिसेंबरपासून नवीन चित्रपटांचे पर्याय उपलब्ध होत आहेत, अशी माहिती चित्रपट वितरक अंकित चंदीरामाणी यांनी दिली. ११ डिसेंबरला कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला ‘इंदु की जवानी’ हा हलकाफु लका हिंदी चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ ‘बंटी और बबली २’, ‘तुलसीदास ज्युनिअर’ असे काही चित्रपट चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होणार आहेत. मात्र डिसेंबरपासून प्रदर्शित होणारे हे सगळे चित्रपट बॉलीवूडमधील पहिल्या फळीतील कलाकारांचे नाहीत. काही अगदीच नवोदित कलाकारांना घेऊन के लेले चित्रपट आहेत. या चित्रपटांसाठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे मोठय़ा संख्येने येणार नाहीत. आम्ही एक तरी मोठय़ा कलाकाराचा चित्रपट आम्हाला द्या, अशी मागणी करतो आहोत. मात्र देशभरातील चित्रपट वितरण व्यवस्था लक्षात घेतली तर राजस्थानसारख्या अनेक भागांतील चित्रपटगृहे अजूनही बंद आहेत. परदेशातील चित्रपटगृहेही पुन्हा बंद झाल्याने निर्माते कमी प्रेक्षकसंख्येच्या भीतीने धोका पत्करायला तयार नाहीत, अशी माहिती ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिली.

डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान प्रदर्शित होणारे चित्रपट हे तुलनेने छोटे चित्रपट आहेत, त्यामुळे वितरक आणि चित्रपटगृह मालक नाराज आहेत. हिंदीत अगदी मोठय़ा कलाकारांचे नाही, मात्र प्रेक्षकांची गर्दी खेचू शकतील, असे जॉन अब्राहम अभिनीत ‘मुंबई सागा’सारखे काही चित्रपट तयार आहेत, पण या चित्रपटांचे निर्माते स्वत:हून बोलायला पुढे येत नसल्याने ही कोंडी फु टत नसल्याचे चंदीरामाणी यांनी स्पष्ट के ले.