कामासाठी घेतलेले पैसे न परत केल्याने चिडलेल्या कलाकाराने निर्मिती व्यवस्थापकाचेच अपहरण करून त्याला लुबाडल्याची घटना गोरेगाव येथे घडली. या प्रकरणातील तिघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
गणेश जाधव हे निर्मिती हाऊस मध्ये काम करतात आणि चित्रनगरीत कलावंत पुरविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी एका नवोदीत कलाकाराकडून चित्रनगरीत कामाला लागणारे ओळखपत्र बनविण्यासाठी ४ हजार रुपये घेतले होते. त्यांनी ओळखपत्र बनवून दिले नव्हते तसेच त्याचे पैसेही परत केले नव्हते. शुक्रवारी जाधव गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात आपल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आले असता या कलावंताने त्यांना भेटायला बोलावले. त्यानंतर आपल्या दोन मित्रांसह जबरदस्तीने जाधव यांना गाडीत टाकून जुहू आणि चकाला परिसरात नेले. त्यांच्या खिशातील ७१ हजार रुपयांची रोकड त्यांनी काढून घेतली. याशिवाय त्यांच्याकडील धनलक्ष्मी बॅंकेचे एटीएम जबरदस्तीने काढून त्यातूनही ३० हजार रुपये काढले. आरोपींनी जाधव यांच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून रात्री साडेअकराच्या सुमारास चकाला येथे सोडून दिले.