करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २० हजार विलगीकरण डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. यात ३ लाख २० हजार खाटांची व्यवस्था असेल. यापैकी ४०० डबे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबईतील कार्यशाळांमध्ये तयार केले जातील.

करोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावामुळे सरकारी व खासगी रुग्णालयांवर मोठा ताण पडत आहे. संशयितांच्या १४ दिवसांच्या विलगीकरणाकरिता खाटांची गरज वाढते आहे. हा वाढता ताण झेलण्याकरिता रेल्वेने पुढाकार घेत विलगीकरण डब्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. यात रेल्वेच्या अतिरिक्त डब्यांच्या रचनेत बदल करुन त्यात एक खाट, वैद्यकीय उपकरणे, रक्त पुरवठा व्यवस्था, व्हेंटिलेटर, प्रसाधनगृह, डॉक्टर व परिचारिका तसेच अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खोली इत्यादी सुविधा असतील.

देशभरातील रेल्वे कार्यशाळा आणि कारखान्यात विलगीकरण डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. या २० हजार डब्यांत सुमारे ३ लाख २० हजार खाटांची व्यवस्था असेल. प्रथम पाच हजार डब्यांच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात एकूण ८० हजार खाटांची व्यवस्था असेल. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील रेल्वे कार्यशाळांमध्येही जवळपास ४०० डब्यांची निर्मिती केली जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या विविध विभागाकडून एकूण ४८२ डब्यांच्या निर्मितीचे काम सोपवण्यात आले असून यामध्ये ५० टक्के निर्मितीचे काम परळ, माटुंगा कार्यशाळेबरोबरच वाडीबंदर, एलटीटीवरही सोपवण्यात आले आहे. तर पश्चिम रेल्वेकडे  ४१० डब्यांच्या निर्मितीचे काम सोपविले आहे.

लोअर परळ ४५, महालक्ष्मी कार्यशाळेत ३०, मुंबई सेन्ट्रल ३० आणि वांद्रे टर्मिनसवर ४५ डब्यांच्या निर्मितीची जबाबदारी असेल. एका डब्यात १६ बेड्स आणि वैद्यकीय सुविधा असतील.