मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी प्रा. धीरेन पटेल यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती विद्यासागर राव यांनी धीरेन पटेल यांची नियुक्ती केली आहे. धीरेन पटेल यांच्याकडे सध्या व्हीजेटीआयच्या संचालकपदाची जबाबदारी आहे. तीन महिन्यांसाठी धीरेन पटेल यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी असणार आहे. तर कुलगुरु संजय देशमुख अचानक रजेवर गेल्याने त्यांचा कार्यभार देवानंद शिंदे यांच्याकडे असेल.

सध्या व्हीजेटीआयचे संचालक असलेल्या धीरेन पटेल यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा कारभार असेल. मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर होईपर्यंत पटेल यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात मुंबई विद्यापीठाकडून हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र यातील अनेक परीक्षांचे निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाहीत. हे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पटेल यांच्या खांद्यावर असणार आहे.

विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल ९० दिवसांनंतरही जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर टीका होते आहे. याच पार्श्वभूमीवर कुलपती विद्यासागर राव यांच्याकडून प्रभारी कुलगुरु पदावर पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी राज भवनात झालेल्या बैठकीनंतर या पदासाठी पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संगणक अभियंता असलेल्या पटेल यांच्या अनुभवामुळे प्रलंबित निकाल लवकर लागण्यास मदत होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरुपद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त होते.