मुंबईतील माटुंगा भागात एका प्राध्यापकाला ऑनलाइन वाईन मागवणे चांगलेच महागात पडले आहे. कारण ही वाईनची बॉटल या प्राध्यापकाला थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 24 हजारांना पडली आहे. माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात शिकवणाऱ्या 38 वर्षीय प्राध्यापकाने वाईनची बॉटल मागवण्याचे ठरवले. यासाठी त्याने महाविद्यालयाच्या शिपायाला स्वतःचे कार्ड डिटेल्स आणि ओटीपी दिला. शिपायाने गुगलवर सर्च करून जवळच्याच वाईन शॉपचा नंबर मिळवला. शिपायाने वाइन शॉपचा नंबर डायल करून प्राध्यापकांच्या कार्डचे सर्व तपशील कळवले. तसेच वनटाइम पासर्वड अर्थात ओटीपीही कळवा. ज्यानंतर काही मिनिटातच एकामागोमाग एक असे सहावेळा पैसे खात्यातून वगळण्यात आले. 24 हजार रुपये गेल्यावर प्राध्यापकांना संशय आला त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली.

माटुंग्यातील रामनारायण रुईया या महाविद्यालयात प्रशांत मसाळी हे जीवरसायन शास्त्र खिकवतात. ते बोरीवलीतील एमएचबी कॉलनीत वास्तव्य करतात. कामात असल्यामुळे त्यांनी महाविद्यालयाच्या शिपायाला वाईन ऑर्डर करण्यास सांगितले. शिपायाकडे त्यांनी त्यांचे क्रेडिट कार्ड आणि मोबाइल फोन असे दोन्ही दिले. गुगलवर सर्च करून शिपाई राडे यांनी बाबा वाईन शॉपचा नंबर मिळवला. वाईन शॉपच्या मालकाने उचलल्यानंतर शिपाई राडे यांनी वाईनच्या बॉटलची ऑर्डर केली. यावेळी दुकानदाराला शिपायाने आपण ऑनलाइन पेमेंट करणार असल्याचे सांगितले. ज्यानंतर वाईन शॉपच्या मालकाने कार्डाचे तपशील आणि ओटीपी मागितला जो शिपायाने त्याला पुरवला. यानंतर ऑनलाइन व्यवहार फोल ठरल्याचे सांगत दुकानदाराने फोन ठेवला.

शिपाई राडे यांनी पुन्हा एकदा दुकानदाराला फोन केला. पुन्हा ओटीपी सांगितला. या सगळ्यात वेळ गेला. दुपारी 4.22 ते 5.35 या कालावधीत फोनवरून ऑर्डरचा प्रयत्न सुरु होता. ज्या दरम्यान प्राध्यापकांना 420 रुपये, 4420,4420, 4420, 5000 आणि 5000 रुपये कापले गेल्याचे सहा मेसेज आले. यानंतर प्राध्यापक मसळी यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार केली अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘मुंबई मिरर’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या अनेक वाईन शॉपचे नंबर बदलले आहेत. यासंदर्भात बऱ्याच वाईन शॉप मालकांनीही तक्रारी केल्या आहेत. शिपाई राडे हा ऑनालाईन फ्रॉड करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला कारण बाबा वाईन शॉपच्या नावाने जो नंबर त्याला मिळाला होता तो चुकीचा होता. या घटनेनंतर आता तरी तुम्ही तुमचा क्रेडिट कार्ड नंबर आणि ओटीपी कोणालाही सांगू नका असे पोलिसांनी म्हटले आहे.