मुंबई: परळ येथील ‘मुंबई इन्स्टिटय़ूट ऑफ लेबर स्टडीज्’ येथे कामगार व्यवस्थापनाशी संबंधित अध्यापनात तब्बल सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ख्यातकीर्त प्रा. रमेशचंद्र दत्तात्रय जोशी यांचे गुरुवारी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

गेली सात वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत असतानाही त्यांनी अध्यापनाचे काम शेवटपर्यंत सुरूच ठेवले होते. मेंदूच्या कर्करोगाने ग्रस्त असतानाही त्यांनी अलीकडेच ‘ट्रेड युनियन इन इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. गेले महिनाभर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या वेळी कामगार व अध्यापन क्षेत्रासह वेगवेगळ्या स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.

प्रा. रमेशचंद्र जोशी यांच्या प्रयत्नामुळे मुंबई विद्यापीठातही कामगार क्षेत्रातील विविध विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली. भारतातील कामगार क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न, कामगार क्षेत्रात सहा दशकांत होत जाणारे बदल, डिजिटल युगातील कामगार क्षेत्राचे स्थान हे त्यांचे खास अभ्यासाचे विषय होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी सादर केलेल्या कामगारविषयक शोधनिबंधातून कामगारांसाठी आवश्यक असलेल्या वेतनश्रेणीचे गठन करण्यास हातभार लागला होता. कामगार संघटना तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी त्यांनी नेतृत्व प्रशिक्षण अभ्यासक्रमही तयार केला होता, तसेच कामगार व्यवस्थापन विषयातील त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रात सक्रिय होण्याआधी त्यांनी विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जबाबदारीची पदे भूषविली. ‘ऑर्गनाझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडय़ुसर्स ऑफ इंडिया’चे ते सेक्रेटरी जनरल होते. लीलावती रुग्णालयातील विख्यात मधुमेहतज्ज्ञ पद्मश्री डॉ. शशांक जोशी हे त्यांचे पुत्र होत.