‘महाराष्ट्र गाथा’ वेब व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प

मुंबई : महाराष्ट्राच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात, ५ मे रोजी, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि विचारवंत प्रा. सदानंद मोरे यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

सुमारे आठशे वर्षांची संतांची दीर्घ आणि अखंडित परंपरा असलेले महाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचे राज्य मानले जाते. सामान्य जनांना या संतपरंपरेने जगण्याचे जसे भान दिले, तसेच, दैनंदिन जीवनातील श्रेयस आणि प्रेयस म्हणजे काय, हेही त्यांना समजेल अशा भाषेत समजावून दिले. महाराष्ट्राचे हे वेगळेपण येथील वैचारिक वारसा संपन्न करणारे ठरले आहे. समाजात तेढ वाढवणाऱ्या अनेक विषयांना या संतांनी थेट स्पर्श केला आणि सुसंघटित समाजनिर्मितीच्या कामात फार मोठे योगदान दिले. या परंपरेचे महत्त्व समजावून घेण्यासाठी प्रा. सदानंद मोरे यांचे हे भाषण महत्त्वाचे ठरेल.

प्रा. मोरे यांचे या विषयावरील प्रभुत्व त्यांच्या आजवरच्या लेखनातून सिद्ध झालेले आहे. संत साहित्याबरोबरच तत्त्वज्ञान, साहित्य, इतिहास, संस्कृती हेही प्रा. मोरे यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. बुधवार ५ मे रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या वेब व्याख्यानात सहभागी होण्यासाठी  पुढील लिंकवर नावनोंदणी करावी लागणार आहे. http://tiny.cc/LS_Maharashtra_Gaatha नोंदणी केल्यानंतर येणाऱ्या ईमेल पत्त्यावर संदेश येईल व त्याद्वारे या कार्यक्रमात सहभागी होता येईल. अधिकाधिक संख्येने ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी या व्याख्यानमालेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

http://tiny.cc/LS_Maharashtra_Gaatha सहभागासाठी येथे नोंदणी आवश्यक.

कधी : आज, बुधवारी  सायंकाळी ६ वाजता

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि  मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिअिरग सव्‍‌र्हिसेस, पुणे</p>