‘मी आयआयटीमधील शिवालिक या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून जीव देईन’, असे सरोजाने महिनाभरापूर्वी एका डायरीमध्ये लिहून ठेवले होते. ही डायरी तिच्या वडिलांच्या हाती लागली तेव्हा त्यांनी तातडीने तिचे मानसोपचारतज्ज्ञांकरवी समुपदेशन केले; परंतु अखेर नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या १७ वर्षीय सरोजाने घराच्या इमारतीवरून स्वत:ला झोकून देत मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली.
पवई पोलीस या आत्महत्येचा तपास करत आहेत. पोलिसांनी कुटुंबाच्या केलेल्या प्राथमिक चौकशीत केंद्रीय विद्यालयातील १२ वीच्या वर्गात शिकत असलेली सरोजा नैराश्येच्या गर्तेत असल्याचे स्पष्ट झाले. महिन्याभरापूर्वी सरोजाने डायरीत आत्महत्या करणार असल्याचे लिहून ठेवले होते. समुपदेशनानंतर गेल्या काही दिवसांपासून सरोजाची प्रकृती बरी होती. मात्र, मंगळवारी सायंकाळी सरोजा शिवालिक इमारतीच्या १४ व्या माळ्यावर गेली. तिने स्वत:ला खाली झोकून दिले. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर त्याविषयी सुरक्षारक्षकांना माहिती दिली. त्यानंतर ती मुलगी सरोजा असल्याचे स्पष्ट झाले.