प्राध्यापकांच्या ‘काम बंद’ला थंड प्रतिसाद ; चर्चेतून तोडगा न निघाल्यामुळे ‘एमफुक्टो’ संपावर ठाम

मुंबई : शिक्षणमंत्री आणि तक्रार निवारण समितीबरोबरील चर्चेतून मागण्यांबाबत तोडगा न निघाल्यामुळे काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका प्राध्यापकांच्या ‘एमफुक्टो’ या संघटनेने घेतली आहे. दरम्यान, मंगळवारपासून राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाला प्राध्यापकांकडून मात्र फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अनेक महाविद्यालयांमधील कामकाज, अध्यापन नियोजित वेळापत्रकानुसार नियोजित सुरू असल्याचे दिसत होते.

विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांच्या ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन’ (एमफुक्टो) या संघटनेने मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. प्राध्यापकांच्या मागण्या आणि तक्रारींबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीची बैठकही मंगळवारी झाली. या बैठकीला ‘एमफुक्टो’सह विविध प्राध्यापक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत ‘एमफुक्टो’च्या मागण्यांबाबतही चर्चा झाली. मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय ‘एमफुक्टो’ने घेतला असल्याचे कळते आहे. राज्यात प्राध्यापकांची भरती करण्यात यावी. यापूर्वीच्या ७२ दिवसांच्या आंदोलनाचे वेतन मिळावे, वेतन आयोगाचे लाभ मिळावेत अशा काही मागण्यांसाठी ‘एमफुक्टो’कडून आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयांच्या कामकाजावर फारसा परिणाम झाला नाही. प्राध्यापकांकडून आंदोलनाला मंगळवारी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई, ठाणे, कोकण, पुण्यासह राज्यातील बहुतेक विभागांमध्ये महाविद्यालयांचे कामकाज आणि अध्यापन सुरळीतपणे झाले. मुंबई आणि परिसरातील बहुतेक महाविद्यालयांमध्ये एखाद दोन कर्मचारी किंवा प्राध्यापकांनी काम बंद ठेवले. मात्र बहुतेकांनी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे तासिका घेण्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसत होते.

‘एमफुक्टो’शिवायही प्राध्यापकांच्या इतर अनेक संघटना, गट राज्य आणि स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. या संघटना ‘एमफुक्टो’च्या आंदोलनात सहभागी नाहीत. प्राध्यापक संघटनांमध्ये ‘एमफुक्टो’चा वरचष्मा असला तरीही स्थानिक पातळीवरील प्राध्यापकांच्या गटांचे प्राबल्यही वाढत असल्याचे दिसत आहे.

या संघटनांमध्ये वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना वेठीला धरून काम बंद आंदोलन करणे योग्य नाही, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे.

भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाशी संलग्न संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या नाहीत. ‘प्राध्यापकांनी आंदोलनात सहभागी होऊ नये,’ असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

‘मागण्यांबाबत सकारात्मक’

‘प्राध्यापकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज सविस्तर चर्चा झाली. त्या मुद्दय़ांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली, त्यामध्ये सातवा वेतन आयोग, पद भरतीचा विषय, ७१ दिवसांच्या प्राध्यापकांच्या संपकाळातील वेतन, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचा विषय आदी होते. या सगळ्या विषयांमध्ये शासन कोणत्या पद्धतीने सकारात्मक विचार करते आहे, याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. आजच्या बैठकीतील लिखित इतिवृत्त दोन्ही संघटनांना देण्यात येईल. प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत शासनाची भूमिका  सकारात्मक आहे. प्राध्यापकांचा बेमुदत संप मागे घेतला जाईल, असा विश्वास आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्राध्यापकांबरोबरील बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.