आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी भाजी विकणे, रिक्षा चालवण्याची कामे; अनेक महिने वेतन रखडले

मुंबई : अनेक महिने वेतनाशिवाय शिकवीत असलेल्या प्राध्यापकांना गेल्या वर्षभरापासून विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अगदी अलीकडच्या दशकापर्यंत पांढरपेशा म्हणून ओळखला जाणारा हा रोजगारसाखळीतील घटक करोना काळात भाजीची दुकाने आणि रिक्षा चालविणे अशी मिळतील ती कामेही करीत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे.

डिसेंबर, जानेवारी हे महिने शैक्षणिक वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांसमोर नोकरीच्या संधी घेऊन येणारे आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून प्राध्यापकांना समाधान मिळवून देणारे. मात्र, आता महाविद्यालये वेतनच देत नसल्यामुळे प्राध्यापकांना मिळेल तो रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.  प्राध्यापकांना त्यांच्या कौशल्यानुसार दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात काम मिळवून देण्यासाठी प्राध्यापक संघटनेने उपक्रम सुरू केला आहे.

वेतन मिळत नसल्यामुळे घर चालवणे कठीण झालेल्या प्राध्यापकांसाठी मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन (मुक्ता) या संघटनेने ‘दिशा’ हे अभियान सुरू केले आहे. प्राध्यापकांना त्यांच्या कौशल्यानुसार काम मिळवून देण्यासाठी या अभियानात प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या तातडीने महाविद्यालयांमध्ये नव्याने नोकरी मिळण्यासारखी परिस्थिती नाही. अनेकांना सध्या घर चालवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे जिथे कामाची संधी आहे आणि प्राध्यापक ते करू शकतील, अशी कामे त्यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी सध्या प्राध्यापकांची गूगल अर्जाच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात येत आहे. राज्यातील कुणीही प्राध्यापक त्यासाठी अर्ज करू शकतील, असे संघटनेचे वैभव नरवडे यांनी सांगितले.

नक्की झाले काय?

अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांना गेले अनेक महिने संस्थांनी वेतन दिलेले नाही. करोनाचे कारण पुढे करणाऱ्या अनेक संस्था गेली अनेक वर्षे नियमित वेतन देत नाहीत. अनेक स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांना संस्थेकडून जेमतेम ५ ते १० हजार रुपये हातावर टेकवले जातात. तेही दरमहा नियमित मिळत नाहीत, असे एका प्राध्यापकांनी सांगितले.

पर्याय नसल्याने…

राज्यातील अगदी नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना वेतनासाठी लढा सुरू आहे. हक्काचे वेतन गमवावे लागेल म्हणून आहे ती नोकरी सोडता येत नाही आणि वेतनासाठी लढायचे तर कुटुंबाची गुजराण कशी करायची, अशा कोंडीत सध्या हजारो प्राध्यापक सापडले आहेत. काही प्राध्यापकांनी भाजीच्या दुकानांपासून, किराणा-वाणसामान घरपोच पोहोचविण्याचेही काम स्वीकारल्याचे सांगितले.

दखल नाही…

विद्यापीठे, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे नियमन करणारी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, विद्यापीठ अनुदान आयोग अशा सर्व प्राधिकरणांकडे प्राध्यापकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, कधीतरी एखादे पत्र पाठवण्यापलीकडे या प्राधिकरणांनी शिक्षणसंस्थांवर कारवाई केलेली नाही.