अभियांत्रिकी महाविद्यालयांतील गरप्रकार, घोटाळे याविरोधात आवाज उठविणाऱ्या सिटिझन फोरम या संस्थेचे मुख्य पदाधिकारी प्रा. वैभव नरवडे यांना पोलिसांकडून नाहक छळवणूक होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नरवडे यांची छळवणूक थांबवावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
सिटिझन फोरमच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे घोटाळे सातत्याने बाहेर काढले जात आहे. फोरमने केलेल्या तक्रारींची दखल घेत राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, उच्च न्यायालयानेही महाविद्यालयांची पूर्ण चौकशी केली. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने केलेल्या या महाविद्यालयांच्या चौकशीत २९ पैकी बहुतांश महाविद्यालये अपात्र ठरवून त्यांची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय दिला. हा लढा देणारे फोरमचे प्रमुख पदाधिकारी प्रा. नरवडे यांच्यावर शिक्षण सम्राटांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी खोटे गुन्हे काढून टाकण्याबद्दलची ‘समरी’ प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. मात्र ते आदेश धाब्यावर बसवून नरवडे यांना त्रास दिला जात असल्याचे केळकर यांनी पत्रात लिहिले आहे.