भरतीसह प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील दहा विद्यापीठांतील प्राध्यापक शिक्षकदिनी मुंबईत

प्राध्यापक भरती करण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांच्या संघटनेने मंगळवारी जेल भरो आंदोलन केले.

प्राध्यापकांच्या महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (एमफुकतो) या संघटनेने आंदोलन छेडले आहे. या आंदोलन साखळीतील जेल भरो आंदोलन प्राध्यापकांनी मंगळवारी केले. आंदोलनासाठी राज्यातील दहा विद्यापीठांमधील एमफुकटोचे शेकडो प्रतिनिधी या आंदोलनासाठी मुंबईत आले होते. मुंबई विद्यापीठाच्या परिसरात पोलिसांनी प्राध्यापकांना अटक करून सोडून दिले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांनुसार २० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक याप्रमाणे प्राध्यापकांची भरती करण्यात यावी. नियमित प्राध्यापकांप्रमाणेच कंत्राटी प्राध्यापकांना वेतन मिळावे, ७१ दिवसाच्या आंदोलनाच्या कालावधीतील वेतन मिळावे, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात यावी, विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षकांना नियमित वेतन मिळावे, प्राध्यापकांसाठी समान काम, समान वेतन धोरण लागू करावे, तक्रार निवारण प्रणाली लागू करण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यात याव्यात, विद्यापीठ कायद्यानुसार अधिकार मंडळातील नेमणुकांचे प्रमाण कमी करण्यात यावे, उच्च शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

यानंतर ११ सप्टेंबरला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २५ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमफुक्टोने दिला आहे.

महाविद्यालयांचे कामकाज सुरळीत

प्राध्यापकांच्या आंदोलनात मुंबई विद्यापीठाच्या बुक्टू या संघटनेचे सर्वाधिक प्रतिनिधी होते. मात्र महाविद्यालयांच्या कामकाजावर त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. मुळात थोडे उशिरा सुरू झालेले सत्र, अचानक द्याव्या लागलेल्या सुट्टय़ांमुळे बुडालेल्या तासिका या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांनी तासिका घेण्यास प्राधान्य दिले. आपापले वर्ग सांभाळून प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे तासिका तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक, अभ्यागत प्राध्यापक यांनीही तासिका घेतल्यामुळे महाविद्यालयाच्या कामकाजावर फारसा परिणाम दिसला नाही.