21 September 2020

News Flash

ऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध

ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी आवश्यक साधने, सुविधा महाविद्यालयांनी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.

संग्रहित छायाचित्र

महाविद्यालये सुविधा देत नाहीत, साधने, जागेची उपलब्धता, महाविद्यालयांकडून वेतन न मिळणे अशा अडचणी उपस्थित करून प्राध्यापकांनी महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाइन सुरू करण्यास विरोध केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सूचनांनुसार महाविद्यालयांनी शुक्रवारपासून ऑनलाइन वर्ग सुरू करणे अपेक्षित होते. मात्र प्राध्यापकांच्या ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टु) या संघटनेने ऑनलाइन वर्गाना विरोध केला आहे. ‘ऑनलाइन वर्ग घेण्याची सूचना देताना त्यासाठी आवश्यक साधने आणि सुविधा कोण उपलब्ध करून देणार? त्यासाठी निकष काय असतील? हे विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही,’ असा आक्षेप संघटनेने घेतला आहे.

प्राध्यापकांच्या अडचणी काय?

ऑनलाइन वर्ग घेण्यासाठी आवश्यक साधने, सुविधा महाविद्यालयांनी उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना वेतन दिले जात नाही. अध्यापनाबरोबरच हे वर्ग घेणे, नियोजन करणे अशा प्रशासकीय कामांचा भारही प्राध्यापकांवर पडला आहे. विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या लिंक्स ते इतरांना पाठवतात. असे प्रकार उघडकीस आले असून त्यामुळे महिला प्राध्यापकांना त्रास होतो. अनेकांच्या घरात तासिका घेता येईल अशी शांत, योग्य जागा नाही, अशा अडचणी प्राध्यापकांनी मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडेही साधने, जागा उपलब्ध नाही असेही प्राध्यापकांनी कुलगुरूंनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

महाविद्यालयांमध्ये येऊन तासिका घेण्याची सक्ती

अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाचे परिपत्रक येण्यापूर्वीच ऑनलाइन तासिका सुरू केल्या आहेत. महाविद्यालये प्राध्यापकांना या तासिका घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये येण्याची सक्ती करत आहेत, अशी तक्रार प्राध्यापकांनी केली आहे. शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत शिक्षणसंस्था बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या असताना प्राध्यापकांना महाविद्यालयांमध्ये येण्याची सक्ती करणे हा नियमभंग असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:47 am

Web Title: professors oppose online classes abn 97
Next Stories
1 तंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून
2 प्रथम वर्ष पदवीच्या ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी भरमसाट शुल्कवसुली
3 मुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती
Just Now!
X