डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील वादामुळे सिद्धार्थ महाविद्यालयांमधील प्राध्यपक व कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन रखडले आहे. या गोंधळामुळे ऑगस्टचेही वेतन मिळणार की नाही, याबद्दल साशंकता आहे.तर  दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून बेकायदा शुल्क वसूल केल्याहबद्दल निलंबित प्राचार्य कृष्णा पाटील यांच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सोसायटीत प्रभारी प्राचार्य विरुद्ध निलंबित प्राचार्य असा नवा संघर्ष सुरु झाला आहे.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आपली अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा करुन पीपल्स सोसायटीचा ताबा घेतला आणि विद्यार्थ्यांकडून बेकायदा व जादा फी घेणाऱ्या प्राचार्य कृष्णा पाटील यांना निलंबित करुन टाकले. त्यांच्या जागेवर प्रा. यू.एम. मस्के यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु पाटील यांनी आपणच प्राचार्य असल्याचा दावा करीत महाविद्यालयाच्या कामात हस्तक्षेप सुरु ठेवला. त्यांच्याविरोधात विद्यापीठ, उच्च शिक्षण सह संचालक व पोलिसांतही तक्रारी करण्यात आल्या. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारच्या वतीने पाटील यांना निलंबित करण्यात आल्याचे विधान परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाने कृष्णा पाटील यांना विद्यार्थ्यांकडून बेकायदा जादा शुल्क वसूल केल्याबद्दल कारणे दाखवा नोटिस बजावली होती. पाटील यांनी प्राध्यापकांचे मस्टर आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे प्राध्यपकांना आपली हजेरी नोंदविण्यासाठी सह्य़ा करता येत नाहीत. ८ ऑगस्टला झालेल्या बैठकीत बहुतांश प्राध्यपक व कर्मचाऱ्यांनी प्रभारी प्राचार्य मस्के यांना पाठिंबा दिला आहे. मात्र तरीही पाटील महाविद्यालयात येऊन कामकाजात हस्तक्षेप करीत असतात, अशी मस्के यांची तक्रार आहे.