सत्तरहून अधिक वर्षांची परंपरा असलेली संस्था ‘काला घोडा असोसिएशन’मध्ये विलीन करण्याच्या हालचाली

मुंबई: कला क्षेत्राला वेगळी दिशा देणाऱ्या, सत्तरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’चे अस्तित्व जागेच्या वादामुळे पणाला लागले आहे. एस. के. बाकरे, वासुदेव गायतोंडे, अम्बादास गाडे, एम. एफ. हुसेन अशा दिग्गज कलाकारांनी स्थापन केलेली ही संस्था ‘काला घोडा असोसिएशन’मध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कलाकारांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा दाखवण्याची चळवळ ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप’ने उभी केली. अनेक दिग्गज कलाकारांनी या संस्थेला मोठे केले.

मुंबईच्या अदर हाऊसमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘आर्टिस्ट सेंटर’ने नवोदित कलाकारांनाही हात दिला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संस्थेने केला. आता मात्र या संस्थेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

असलेली जागा न्यायालयीन प्रकरणानंतर सोडण्याची वेळ संस्थेवर आली आहे. त्यामुळे ही संस्था काला घोडा असोसिएशनमध्ये विलीन करण्याचा घाट घातला जात आहे. संस्थेचे काही विश्वस्त हे काला घोडा असोसिएशनच्या अधिकार मंडळावरही आहेत. न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी बुधवापर्यंत (२३ ऑक्टोबर) वेळ आहे.

मात्र, संस्थेच्या विश्वस्तांनी न्यायालयीन लढाई लढण्याऐवजी संस्थेकडील जवळपास सत्तर लाख रुपयांच्या निधीसह संस्था विलीन करण्याचे नियोजन केले आहे. संस्थेशी जोडले गेलेले कलाकार, सदस्य यांचा यासाठी विरोध आहे. ‘संस्थेचा हा वारसा जपला पाहिजे. त्यासाठी संस्थेने आता माघार न घेता लढले पाहिजे,’ असे मत संस्थेचे सदस्य कलाकार नीलेश किंकळे यांनी व्यक्त केले.

काय झाले?

प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप ही संस्था फोर्ट परिसरातील अदर हाऊस येथे कार्यरत होती. त्या जागेचा मालकी हक्क बदलला. नव्या मालकांनी २०११ मध्ये आर्टिस्ट सेंटरला जागा सोडण्यास सांगितले. संस्थेने त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाचा निकाल आर्टिस्ट सेंटरच्या विरोधात लागला. जागा सोडण्याबरोबरच गेल्या ९ वर्षांचे भाडे आणि त्याचे व्याज भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संस्थेला हे व्याज परवडणारे नव्हते, मात्र जागा ताब्यात देत असल्यास हे भाडे माफ करण्याचा तोडगा निघाला. त्यामुळे संस्थेला अदर हाऊसमधील जागा सोडण्याची वेळ आली. आता जागा नसल्यामुळे असलेला संग्रह कुठे ठेवायचा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

विश्वस्त काय म्हणतात?

‘संस्थेच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत काळा घोडासारख्या परिसरातील जागा परवडणे शक्य नाही. जागा सोडली नाही तर त्याचे भाडे आणि व्याज विश्वस्तांना भरावे लागेल. संस्था विलीन करण्यात येणार नाही. ‘आर्टिस्ट सेंटर’ची ओळख कायम ठेवून काला घोडा असोसिएशन बरोबर काम करण्यात येईल. असलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना, नव्या कलाकारांना शिष्यवृत्ती देण्याचा विचार करण्यात येत आहे. ती आर्टिस्ट सेंटरच्याच नावाने दिली जाईल. काला घोडा असोसिएशनची जागा ही आर्टिस्ट सेंटरच्या सध्याच्या जागेशेजारी आहे. त्यामुळे संस्थेकडील संग्रहाची मालकी कायम ठेवून त्याचे पालकत्व काला घोडा असोसिएशनकडे देण्याचा विचार करण्यात येत आहे. काही सदस्य दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हे सोयीचे होईल. याबाबत नियामक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल,’ असे संस्थेचे सदस्य मधूसुदन कुमार यांनी सांगितले.

प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचा वारसा

स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीमध्ये देशभर हिंसाचार उफाळला होता. त्यावेळी एफ. एन. सुझा, एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा, एच. ए. गाडे, एस. के. बाकरे, के. एच. आरा या दिग्गज कलाकारांनी एकत्र येऊन प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप स्थापन केला. देशातील कलेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न कलाकारांनी या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांनी केला. संस्थापक कलाकार कालांतराने परदेशी गेले. त्यानंतर वासुदेव गायतोंडे, क्रिशेन खन्ना, मोहन सामंत, मनिशी डे, राम कुमार, तय्यब मेहेता यांनी संस्थेचे काम पुढे नेले. १९४७ पासून ही संस्था कार्यरत आहे. कला दालनाची संकल्पना या संस्थेने भारतात रुजवली.